एच.के.तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा
लोणी ज्ञानेश्वर साबळे बदलत्या काळातील अनेक आव्हानांना सामोरे जात तंत्रज्ञानाच्या युगात दिशाहीन नव्या पिढीला फक्त साहित्यच दिशा देऊन संस्कारक्षम बनवू शकते,असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनी विखे पाटील यांनी केले.
लोणी येथील सम्यक साधना संघ,भीमाई प्रतिष्ठाण व शब्दगंध साहित्यिक परिषद, राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने एच. के. तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त आयोजित पुस्तक प्रकाशन व स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा.आ.लहू कानडे, प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,शिक्षक नेते कैलास चिंधे,पं.स. सदस्य संतोष ब्राम्हणे, प्रा.हरीभाऊ आहेर व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सौ.शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत एच. के. तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे लिखित अग्निदिव्य या कथा संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य ब्राम्हणे यांनी नेहमी शिस्तीला व शिक्षणाला महत्व दिले.यासोबत त्यांनी आपली साहित्य संपदा जोपासून प्रवरेच्या सांस्कृतिक वारशात मोलाची भर घातल्याची भावना सौ. विखे यांनी व्यक्त केली.
प्राचार्य ब्राम्हणे यांचे साहित्य नव्याने जगायला शिकवणारे व वास्तवदर्शी असल्याचे त्या म्हणाल्या. ब्राह्मणे कुटुंबाने सुरू केलेला हा उपक्रम समाजासाठी आदर्श असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.यावेळी आयुष्य जगताना सोसलेल्या यातना व त्यातून फुलविलेलं नंदनवन याचा प्रवास म्हणजे अग्निदिव्य असल्याचे प्रतिपादन मा.आमदार लहू कानडे यांनी अध्यक्षस्थानाहून केले.
आपल्या भाषणात बोलताना आ. कानडे यांनी दिवंगत खा.बाळासाहेब विखे पाटील यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा देताना आपली राजकीय सुरुवात ही बाळासाहेब विखेंमुळेच झाल्याचे अधोरेखित केले. मृत्यूनंतरही जिवंत राहण्यासाठी माणसाने चांगल्या कर्माची साठवणूक करावी व प्राचार्य ब्राम्हणे सरांप्रमाणे अजरामर व्हावे, असे आवाहन केले.
साहित्य चळवळ आणखी गतिमान होण्यासाठी सर्वांनी पुढे यावे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरम्यान २०२६ चा एच. के. तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार प्रसिद्ध कवी प्रा. शशिकांत शिंदे यांना व एच. के. तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शिक्षक जी.ए.पठाण यांना तर के.डी.सातपुते स्मृती जीवनगौरव पुरस्कार भास्कर साळवे तथा कमलवीर प्रज्ञारत्न यांना प्रदान करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सम्यक साधना संघ,लोणी, भीमाई प्रतिष्ठाण व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सत्तार शेख यांनी तर आभार प्रदर्शन संतोष उबाळे यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांचे विशेष योगदान लाभले.
