सुनील ईश्वर पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या अष्टपैलू कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रवरा परिसरातील बाभळेश्वर येथील प्रतिभावान कलाकार सुनील ईश्वर पाटील यांनी आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला  आहे. त्यांना नुकताच छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवी मुंबईतील वाशी येथे नुकत्याच पार पडलेल्या एका अत्यंत दिमाखदार आणि भव्य सोहळ्यात सुनील पाटील यांना २०२६ सालच्या मानाच्या 'छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराने' गौरवण्यात आले. या पुरस्कारामुळे केवळ संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.

हा विशेष गौरव सोहळा 'छावा प्रतिष्ठान शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन आयोजक अमित गडांकुश  यांनी केले होते.सुनील पाटील यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ सिने अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची उपस्थिती लाभली होती. सुनील पाटील यांनी कला क्षेत्रात विशेषतः चित्रपट आणि संगीत व्हिडिओंच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, तसेच त्यांची जिद्द आणि कष्टाची दखल घेऊनच त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

अतिशय कमी वयात सुनील पाटील यांनी चित्रपट सृष्टीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक सुपरहिट चित्रपट आणि मनाला भिडणाऱ्या गाण्यांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी मोठी दाद दिली आहे. केवळ संवादच नाही तर आपल्या देहबोलीतून वातावरण निर्मिती करण्याच्या त्यांच्या कौशल्याने त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप पाडली आहे.

वाशी येथील या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी सुनील पाटील यांचे कौतुक करताना उपस्थितांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या आनंदाच्या क्षणी सुनील पाटील भावूक झाले होते. आपल्या यशाबद्दल बोलताना त्यांनी या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय आपल्या आईला आणि आपल्या गुरूंना दिले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. या यशानंतर त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून,आगामी काळातही अशाच प्रकारे दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आणि गावाचे नाव मोठे करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!