कौलाघात मामाचं गाव ’हरवले’; शहरी बच्चे कंपनी ग्रामीण भागातील जीवनाला मुकली

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव मामाचा गाव' ही महाराष्ट्रातील सुट्टीची एक लोकप्रिय संकल्पना आहे, जिथे शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात, शेतात खेळणे, आंबे-चिंचा खाणे आणि मावसभावांसोबत धमाल-मस्ती केली जाते  हे ठिकाण लहान मुलांसाठी आनंदाचा ठेवा असून,अनेकदा खेड्यापाड्यातील निसर्ग, ग्रामीण जीवन आणि पारंपारिक जेवणाशी संबंधित असते.आजच्या धावपळीच्या आणि यांत्रिक युगात आपण इतके हरवून गेलो आहोत की, स्वतःच्या आनंदासाठी दोन क्षण शांतपणे जगणेही कठीण झाले आहे. या धावपळीत हरवलेल्या प्रत्येकाला जर विचारले की तुमच्या आयुष्यातील सर्वात निवांत आणि आनंदी काळ कोणता,तर प्रत्येकाचे उत्तर एकच असते, ते म्हणजे मामाच्या गावाला घालवलेली उन्हाळ्याची सुट्टी.पण आजची परिस्थिती इतकी बदलली आहे की,जर एखाद्या मुलाला मामाच्या गावाचा पत्ता विचारला, तर त्याला तो आधी गुगलवर शोधून सांगावा लागेल. हे ऐकायला जरी थोडे विनोदी वाटत असले तरी त्यातील दाहक सत्य आजच्या पिढीच्या बदललेल्या जीवनशैलीवर बोट ठेवणारे आहे. आज खरोखरच आपल्या हक्काचे आणि जिव्हाळ्याचे मामाचे गाव कुठेतरी हरवत चालले आहे की काय,अशी शंका मनात येते.
पूर्वीच्या काळी शाळेला सुट्ट्या लागल्या की मुलांच्या आनंदाला पारावार उरत नसे. सुट्टीचा निकाल लागण्या आधीच मामाच्या गावाला जाण्याचे नियोजन पूर्ण झालेले असायचे.लालपरीचा तो प्रवास, धुळीने माखलेले रस्ते आणि गावात शिरताच येणारा तो मातीचा सुगंध मनाला उभारी देऊन जायचा. झाडावर चढून कैऱ्या पाडणे,रसाळ आंबे खाणे आणि मनसोक्त बागडणे ही मजा काही वेगळीच होती.पण दुर्दैवाने आजची मुले शहरातल्या चार भिंतींमध्ये अडकली आहेत.सिमेंटच्या जंगलात वावरणाऱ्या या मुलांना झाडावर चढण्याची मजा किंवा निसर्गाचा खरा स्पर्श काय असतो हे कधी कळणारच नाही.शहरात काचेच्या खिडक्यांमधून दिसणारे आकाश आणि डोळ्यांना थकवा देणारे मोबाईलचे स्क्रीन्स यामध्ये आजचे बालपण गुदमरत आहे.
जेव्हा माणूस धावपळीच्या आयुष्यात पार थकून जातो, तेव्हा त्याला नकळत आठवण येते ती आपल्या गावच्या मातीची आणि तिथल्या आईच्या मायेची सावली देणाऱ्या घराची. शहरात कितीही भौतिक सोयी-सुविधा असल्या, पंचतारांकित हॉटेल्स असली तरी आईच्या मायेची आणि आजी-आजोबांच्या प्रेमाची ऊब ही फक्त गावाकडेच मिळते. तिथल्या साध्या जेवणात जी चव असते, ती जगातील कोणत्याही महागड्या पक्वान्नामध्ये नसते. पण हल्लीच्या काळातील पालकांची मानसिकता बदलली आहे. सुट्ट्या लागल्या की मुलांना मामाच्या गावी पाठवण्याऐवजी त्यांना विविध 'समर कॅम्प' किंवा उन्हाळी शिबिरांमध्ये प्रवेश मिळवून देण्याची जणू चढाओढ लागली असते. मुलांना काहीतरी नवीन शिकता यावे या उत्साहापोटी पालक त्यांना या शिबिरांमध्ये व्यस्त ठेवतात.
परंतु आपण कधी शांतपणे विचार केला आहे का की, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जे निखळ सुख आणि अनुभव मिळतात, ते एखाद्या बंदिस्त समर कॅम्पमध्ये कधी मिळतील का? याचे उत्तर नक्कीच 'नाही' असे आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून जे जीवनशिक्षण मुलांना मिळते, ते कोणत्याही शिबिरात शिकवता येत नाही. समर कॅम्पमध्ये कौशल्ये शिकता येतील, पण नात्यांची वीण कशी घट्ट करायची, मातीशी कसं जोडलं जायचं आणि साधेपणात कसा आनंद शोधायचा, हे फक्त मामाच्या गावाच्या अंगणातच कळू शकते. म्हणूनच आज गरज आहे ती आपल्या मुलांना पुन्हा एकदा त्या मातीची ओळख करून देण्याची, जेणेकरून त्यांचे बालपण केवळ मोबाईल आणि शिबिरांपुरते मर्यादित न राहता निसर्गाच्या कुशीत बहरून निघेल.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!