आडगाव जि.प.बेंद वस्ती शाळेत भिमजयंती उत्साहात साजरी

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार,ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राहाता तालुक्यातील आडगाव येथील बेंद वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अभिवादन करून भिमजयंती साजरी करण्यात आली.
प्रसंगी शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत महामानवाच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या गौरवशाली कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी 'जय भीम'च्या जयघोषाने शाळा परिसर दुमदुमून टाकला होता.

या विशेष कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ज्ञानदेव पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासाची आणि त्यांनी दिलेल्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या मंत्राची माहिती दिली तसेच शाळेचे शिक्षक पंढरीनाथ बाजीराव बेंद्रे यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीवर प्रकाश टाकला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नेते नव्हते,तर ते एक महान विचारवंत,समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि जागतिक दर्जाचे विद्वान होते.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून दलितांना आणि शोषितांना न्याय मिळवून दिला.भारताला जगातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक राज्यघटना देऊन त्यांनी लोकशाहीची मुळे घट्ट केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन सहानभूतीचा नव्हता तर तो हक्क आणि न्याय यावर आधारित होता स्त्रीला देखील शिक्षणाचा समान अधिकार आहे हे त्यांनी समाजाला दाखवून दिले स्त्रीला शिक्षण आणि स्वातंत्र्य आत्म सन्मान मिळाल्याशिवाय सामाजिक परिवर्तन होणे शक्य नाही त्यांचा ठाम विश्वास होता आज देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि प्रतिष्ठा मिळाली आहे,असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रम दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनीही बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित छोटी भाषणे सादर केली. मुख्याध्यापक प्रकाश पोकळे आणि शिक्षक पंढरीनाथ बेंद्रे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे ज्ञानाच्या जोरावर जगाला आपली दखल घ्यायला लावली, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जिद्दीने अभ्यास करून स्वतःचे आणि गावाचे नाव आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे,असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.या सोहळ्यासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.अत्यंत साध्या पण प्रभावी पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण केली असून, महामानवाचे विचार घराघरात पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!