लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग,दिंडोरी प्रणित यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून एका अत्यंत भव्य आणि दिव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या गुरुवार, ८ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून बुधवार, १५ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे.
या हप्ताभराच्या कालावधीत लोणी परिसरात भक्तीचा महापूर येणार असून अखंड नामजप,यज्ञ आणि गुरुचरित्र पारायण सप्ताहाच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण निर्मिती होणार आहे.मानवी जीवनात येणाऱ्या विविध अडचणी,मग त्या मानसिक ताणतणावाशी संबंधित असोत किंवा कौटुंबिक स्वास्थ्य,उत्तम आरोग्य,विवाह,नोकरी आणि संतती विषयक प्रश्नांशी निगडित असोत,या सर्वांवर आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रभावी उपाय मिळावा हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे.
या मंगलमय सप्ताहाच्या कालावधीत अनेक महत्त्वपूर्ण धार्मिक विधींचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये ग्रामदेवता सन्मान, मंडळ स्थापना,अधिष्ठापन आणि विविध हवनांचा समावेश आहे. विशेषतः या सोहळ्यात गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, पितृ याग आणि मल्हारी याग यांसारखे अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष याग संपन्न होणार आहेत.
या सर्व विधींमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होणार आहे.या सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने बलि पूर्णाहुती, सत्यनारायण पूजा,अखंड नामजप यज्ञ आणि रीतसर देवता विसर्जनाने होणार आहे. हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोजकांनी सूक्ष्म नियोजन केले आहे.
दैनिक कार्यक्रमाची आखणी अतिशय शिस्तबद्ध असून दररोज पहाटे साडेपाच वाजल्यापासून सामूहिक गुरुचरित्र पारायणाने दिवसाची मंगलमय सुरुवात होईल. त्यानंतर विविध अभिषेक आणि सामूहिक औदुंबर प्रदक्षिणा घातली जाईल, ज्यामुळे भक्तांना एक वेगळीच आत्मिक शांती अनुभवता येईल.
दुपारच्या सत्रात श्री स्वामी चरित्र आणि दुर्गा सप्तशतीचे पारायण पार पडेल, तर सायंकाळच्या वेळी पुन्हा प्रदक्षिणा व नैवेद्य आरती झाल्यानंतर रात्रीच्या वेळी स्वाध्याय आणि सामुदायिक नामस्मरणाने दिवसाची सांगता होईल. विशेष म्हणजे सेवेकरी महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र वेळेनुसार सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व हे वेदांइतकेच श्रेष्ठ मानले जात असल्याने या माध्यमातून मिळणारी मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा भाविकांसाठी फलदायी ठरणार आहे. या मंगलमयी सोहळ्यात परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा,आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
