लोणी रुपाली भालेराव समाज परिवर्तनाच्या पवित्र ध्येयातून आणि वारकरी संप्रदायाची थोर परंपरा जोपासण्यासाठी राहाता तालुक्यातील चंद्रपूर येथे दर महिन्याला शुद्ध एकादशीनिमित्त विशेष कीर्तन उत्सवाचे आयोजन केले जाते. याच परंपरेचे सातत्य राखत, येत्या सोमवार २७ एप्रिल रोजी चंद्रपूर येथील हनुमान मंदिरात भव्य कीर्तन सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा किर्तनकार ह.भ.प. सौ. ज्योती महाराज पवार यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ही भक्तीची गंगा चंद्रपूरकरांसाठी वाहणार आहे.
हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून अखंडपणे सुरू असून चंद्रपूर पंचक्रोशीतील भजनी मंडळ आणि भाविक भक्तांच्या उत्स्फूर्त सहकार्यातून या महोत्सवाचे अत्यंत नेटके नियोजन केले जाते.
यावेळच्या एकादशी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कीर्तनासोबतच होणारे संतपूजन आणि फराळाचा महाप्रसाद होय. या धार्मिक कार्यासाठी दत्तात्रय विठ्ठल तळोले, अविनाश पवार, संजय गवळी आणि शिक्षक विलास तांबे यांनी अन्नदाते म्हणून महाप्रसादाचे चोख नियोजन केले आहे.
या महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना मायराज महाराज अनर्थे चंद्रपूरकर यांनी सांगितले की, केवळ एक धार्मिक विधी म्हणून नव्हे तर समाजातील विचारांचे परिवर्तन व्हावे आणि युवा पिढीला संस्कार मिळावेत या उद्देशाने हा उत्सव दर महिन्याला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या सोहळ्यासाठी चंद्रपूर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा आणि त्यानंतर आयोजित फराळ महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनर्थे महाराज तसेच चंद्रपूर पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यात्म मुळे मनुष्य जीवनाला परिपूर्णता येते. प्रत्येकाच्या आयुष्यात छोटी मोठी संकट ही येतच असतात या संकटांनाही सामोरे जाण्याची सकारात्मक ऊर्जा हरिनाम कीर्तनातून प्राप्त होते.
समाजात राहत असताना एकमेकांशी वर्तन करण्याची आणि वागण्याची रीत या अध्यात्मा सोहळ्यातून शिकता येते. मनुष्य जीवन हे क्षणभंगुर आणि कवडीमोल आहे आलेल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा भरभरून आनंदानेजगता आला पाहिजे. कोणालाही न दुखवता होईल तेवढी मदत आपल्याकडून समाजाला दिली गेली पाहिजे यातून खूप मोठे समाधान प्राप्त होते.
