नवी दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने पुन्हा एकदा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात लक्षणीय वाढ केली आहे.नुकत्याच लागू झालेल्या या नवीन दरांचा थेट परिणाम हॉटेल्स,रेस्टॉरंट्स व्यवसायांवर होणार आहे.
१९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल २१८ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.परिणामी,वेगवेगळ्या शहरांमध्ये दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आखातात सुरु असलेल्या युद्धाचा फटका आता व्यवसायांवर आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आता दिल्लीत सिलिंडरसाठी १९४ रुपये, चेन्नईत २०३ रुपये, मुंबईत १९६ रुपये आणि
कोलकातामध्ये २१८ रुपये अधिक मोजावे लागतील. मात्र, यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.एका महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेली ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीनंतर,दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत पूर्वीच्या १८८४.५० रुपयांवरून २०७८.५० रुपये झाली आहे. मुंबईत किंमत २०३१ वर पोहोचली आहे. कोलकातामध्ये १९ किलोग्राम सिलेंडरची किंमत आता २२०८ रुपये झाली आहे.चेन्नईमध्ये आता सिलेंडर २२४६.५० रुपयांमध्ये उपलब्ध होईल. पाटण्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर २३६५ पर्यंत वाढला आहे, तर जयपूरमध्ये त्याची किंमत २०३१ पर्यंत वाढली आहे.दुसरीकडे,या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या तुटवड्याच्या खोट्या बातम्या
वणव्यासारख्या पसरत आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही केवळ एक अफवा असल्याचे सांगितले आहे. सत्य हे आहे की देशात पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या परिणामांपासून वाचवण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपयांनी कमी केले आहे. याव्यतिरिक्त, देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाचा अखंड पुरवठा कायम ठेवण्यासाठी, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) वर निर्यात शुल्क आकारण्यात आले आहे. एलपीजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) बाबतीत, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थोडासा परिणाम झाला असला तरी,पुरवठा साखळी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
