लोणी रुपाली भालेराव भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशाची एकता टिकवून ठेवण्यासाठी अनेक जण आपल्या स्तरावर प्रयत्न करत असतात.असाच एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रयत्न आंध्र प्रदेशातील पुंगानुर येथील रहिवासी अब्दुल गफूर मीर करत आहेत. त्यांनी आपल्या घरापासून ते थेट राजस्थान मधील जोधपूर पर्यंत 'पायी यात्रा' सुरू केली असून, त्यांचा हा प्रवास केवळ शारीरिक नसून तो विचारांचा आणि मानवतेचा आहे.सध्या हे शांतीदूत लोणी परिसरात दाखल झाले असून,त्यांच्या या असीम जिद्दीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
अब्दुल गफूर मीर यांनी या प्रवासासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा रथ तयार केला आहे. हाताने ओढल्या जाणाऱ्या या छोट्या गाडीला त्यांनी फिरते प्रतीक बनवले आहे.गाडीवर सर्वात उंचावर भारताचा तिरंगा डौलाने फडकत असून, खालच्या बाजूलाही तिरंग्याचे फलक लावण्यात आले आहेत.
"पुंगानुर ते जोधपूर राजस्थान: देशात सुख आणि शांतीसाठी पायी यात्रा" असा स्पष्ट संदेश या गाडीवर लिहिलेला आहे. या रथाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यावर लावलेली मानवतावादी पोस्टर्स. "सर्वात मोठे नाते मानवतेचे" असे एका पोस्टरवर ठळकपणे नमूद केले आहे,
जे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
या शांतीदूताच्या गाडीवर केवळ प्रवासाचा मार्गच नाही, तर जगण्याला नवी दिशा देणारे सुविचारही पाहायला मिळतात. "ज्यांनी आपल्या आई- वडिलांचा आदर केला, त्यांनी खऱ्या अर्थाने भारत मातेचा आदर केला" असे सांगून त्यांनी कौटुंबिक संस्कारांना देशप्रेमाची जोड दिली आहे.
अब्दुल गफूर मीर हे एकटेच ही गाडी ओढत हजारो मैलांचा रस्ता तुडवत आहेत. रस्त्यात येणारे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, लोकांच्या मनात देशाबद्दलची ओढ आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे.
त्यांच्याकडे असलेल्या 'माय इंडिया - माय आयडेंटिटी' या ओळखपत्रावर "जिथे तिरंगा आहे, तिथे माझा अभिमान आहे" असे ब्रीदवाक्य लिहिले आहे. हे वाक्य त्यांच्या प्रवासाचे सार सांगण्यासाठी पुरेसे आहे. प्रवासात भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधत, त्यांना शांततेचे महत्त्व पटवून देत ते पुढे जात आहेत.
त्यांच्या या रथावर विविध धर्मांच्या प्रार्थना आणि संदेशही पाहायला मिळतात,जे भारताच्या 'सर्वधर्मसमभाव' या संकल्पनेला अधिक बळकट करतात.लोणी परिसरातून मार्गक्रमण करताना नागरिकांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
कोणताही राजकीय पाठिंबा किंवा मोठ्या निधीची अपेक्षा न करता, केवळ एका ध्येयाने प्रेरित होऊन निघालेल्या या अवलियाच्या प्रवासाने अनेकांना थक्क केले आहे.अब्दुल गफूर मीर यांचा हा प्रवास केवळ एका राज्याकडून दुसऱ्या राज्याकडे जाणारा मार्ग नसून, तो सर्व नागरिकांना जोडणारा एक सेतू ठरत आहे.
जोधपूरपर्यंतचा हा खडतर प्रवास ते आपल्या दृढ निश्चयाने पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या निस्वार्थी कार्याला सर्व स्तरांतून दाद मिळत आहे. आपली देशभक्ती ही २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट या दिवशीच बघायला मिळते परंतु फार कमी नागरिकांमध्ये देशभक्तीचे धडे कायमस्वरूपी अंमलात आणून त्याप्रमाणे आचरण करणारे व्यक्तिमत्व फार कमी प्रमाणात दिसून येतात.सलाम यांच्या देशभक्तीचचे ध्येय वेडेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि सजग नागरिकांना प्रेरणादायी ठरत आहे
