झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे नुकताच एक अजब आणि धक्कादायक प्रकार घडला, गावातील एका तरुणाने चक्क ट्रॅक्टर घेऊन सरकारी रस्ताच नांगरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता प्रवरा डावा कालव्या लगत असल्याने त्यामुळे सिंचन व्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर, जोर्वे-उबंरी बाळापूर दाढ बुद्रुक कोलारु या महत्त्वाचा जिल्हा मार्ग क्रमांक २१वर महेश तथा छोट्या अनिल सरोदे याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने थेट नांगर फिरवला.
काही वेळेतच रस्त्याचा मोठा भाग उकडून निघाल्याने रस्ता खिळखिळा झाला झाल्या प्रकाराने वाहनधारक आणि ग्रामस्थ स्तब्ध झाले.या प्रकारामुळे केवळ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही,तर लगतच्या प्रवरा डाव्या कालव्याच्या माती भरावाला ही धक्का बसला.त्यामुळे कालव्याच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राहता कार्यालयातील कर्मचारी बबन मोहोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाणे येथे संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४ (५),२८५ तसेच महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान सरकारी रस्त्याच नांगरल्याची"चर्चा पंचक्रोशीत रंगली असून, हा प्रकार नेमकं कोणत्या कारणातून घडला याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. प्रकरणाच्या पुढील तपास आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे करत आहे.
