समाज माध्यमातून वाढणारा सोशल फोबिया ‌मुलांसाठी घातक

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव मुलांचा अति-सोशल मीडिया वापर त्यांच्या मानसिक आरोग्यावर, अभ्यासावर आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करू शकतो.यामुळे चिंता,नैराश्य, सायबर बुलिंग (छेडछाड),आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.म्हणूनच पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा घालणे अत्यंत गरजेचे आहे.यावेळी प्रश्न पडतो की रात्रंदिवस सोशल मीडियावर मुलं ॲक्टिव्ह राहतात;पण मुलं 'सोशल' होणं का टाळतात?हा सोशल फोबियाच आता मुलांसाठी घातक ठरतोय.आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे तरुण पिढीचे जग पूर्णपणे बदलून गेले आहे. फेसबुक इंस्टाग्राम, विविध रील्स,ऑनलाइन गेम्स आणि चॅटिंगच्या आभासी विश्वात रमणारी अनेक मुले प्रत्यक्ष सामाजिक आयुष्यापासून मात्र दूर जात असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.

मित्रमैत्रिणीं मध्ये मिसळणे,नातेवाईकांशी संवाद साधणे, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे किंवा नवीन लोकांशी बोलणे टाळणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती समोर आलेली आहे. पूर्वी मुले मैदानावर खेळायला जायची,पण आता ती घराच्या कोपऱ्यात बसून मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवून गेल्याचे बघायला मिळते.

या वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलांच्या मानसिकतेवर आणि स्वभावावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक पालकांच्या मते, मुले आता घरातही फारसे कोणाशी बोलत नाहीत.जेवताना, प्रवासात किंवा मोकळ्या वेळेतही त्यांचे सर्व लक्ष मोबाईल मध्येच असते.

यामुळे कुटुंबातील सदस्यां मधील संवाद कमालीचा कमी झाला असून,कौटुंबिक नाते संबंधांमध्ये भावनिक दुरावा वाढत असल्याची चिंता सातत्याने व्यक्त होत आहे.बाहेरचे जग सोडा,मुले आता घरच्यांशीही संवाद साधायला तयार नसतात,अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोशल मीडिया हे आजच्या काळातील प्रभावी संवाद माध्यम असले तरी त्याचा अतिरेक मुलांना आणि तरुणांना प्रत्यक्ष सामाजिक आयुष्यापासून दूर नेऊ लागला आहे. केवळ तरुणच नव्हे,तर मध्यमवयीन व्यक्तींनाही या आभासी जगाचे व्यसन लागल्याचे दिसते.

सतत मोबाईलमध्ये गुंतल्याने मुलांचा स्वभाव चिडचिडा,अबोल आणि अतिथिक्षीद्र बनत चालला आहे.या सर्व बाबी अत्यंत धोकादायक असून मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या ठरत आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो किंवा व्हिडिओला किती लाईक्स मिळाले, किती व्ह्यूज आले किंवा कोणत्या कमेंट्स आल्या, यावरून अनेक मुलांचा मूड ठरतो.अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्यास मुलांमध्ये नैराश्य, असुरक्षितता आणि मानसिक ताण वाढण्याची दाट शक्यता असते,असे तज्ज्ञ सांगतात.

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते,सोशल मीडियाच्या आभासी जगात रमल्यामुळे मुलांचे प्रत्यक्ष मैदानी खेळ, मित्रांसोबत गप्पा मारणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे या सर्व गोष्टींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

अनेक मुलांना ऑनलाईन जग जास्त सुरक्षित आणि सोयीचे वाटत असल्याने ती बाहेरील जगाशी संपर्क तोडू लागली आहेत.या स्थितीला 'सोशल फोबिया' असे म्हटले जाते, ज्यामध्ये नवीन लोकांसमोर बोलताना भीती वाटणे,सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळणे,आत्मविश्वास कमी होणे आणि सतत चिंता किंवा घाबरल्यासारखे वाटणे अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात.

आजकाल १० ते १५ टक्के मुलांमध्ये हा सोशल फोबिया निर्माण झाल्याचे मानसोपचार तज्ञ सांगतात.या गंभीर समस्येमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.मुलांचा हा वाढता धोका टाळण्यासाठी पालकांनी सर्वप्रथम स्वतःच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

विशेषतः १२ वर्षांखालील मुलांच्या हातात मोबाईल देणे पूर्णपणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांशी दररोज संवाद साधला पाहिजे, त्यांच्या मोबाईल वापरासाठी वेळेची मर्यादा आखून दिली पाहिजे.मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी आणि प्रत्यक्ष उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे,तसेच कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याची सवय लावली पाहिजे.

मुलांच्या वागण्यात मोठा बदल किंवा नैराश्य दिसून आल्यास त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.आजची तरुण पिढीला मोबाईल  व्यसनापासून दूर करणे ही सामाजिक जबाबदारी आहे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आज प्रत्येक घरामध्ये असणारी छोटी मुले देखील एकलकोंडे झालेले आहेत. या मुलांना मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर काढणे हे प्रत्येक पालकाने लक्षात घेणे फार गरजेचे आहे. त्यामुळे मुलांना मोबाईलच्या विळख्यातून  बाहेर आणणे हे कधीही चांगलेच नाही का.!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!