झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने धुमाकूळ घातला असून, डिग्रस गावातील एका घराची भिंत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत महादू दगडू माळी वय ६४
घडलेल्या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मौजे डिग्रस येथील गट क्रमांक ४८४ मधील रहिवासी महादू दगडू माळी (वय ६४) हे बुधवार दि. १३ मे रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात होते. दरम्यान अचानक जोरदार वादळी वारा, विजांचा गडगडाट व पावसास सुरुवात झाली. सुमारे ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान घराची भिंत अचानक कोसळल्याने ते भिंतीत विट सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले व गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान,घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्राममहसूल अधिकारी गायकवाड, ग्राम विकास अधिकारी रुपाली कहाणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तसेच भागवत धुळाजी तोरे यांच्या ही घराची भिंत कोसळली आहे या ही ठिकाणी महसुल अधिकारी गायकवाड व ग्रामसेवक रुपाली कहाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे.तालुक्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.यावेळी .अशोक खेमनर .रंगनाथ भाऊसाहेब बिडगर, शिवदास सावळेराम वाघ, गोकुळ शहाजी बिडगर , रामनाथ दत्तु बर्डे , नवनाथ वावरे, बाबासाहेब माळी आदी पंचासमक्ष पंचनामा केला आहे.
