सोशल मीडियावर निमंत्रण देण्याचा वाढता ट्रेंड तुफान
लोणी रुपाली भालेराव एकेकाळी लग्न समारंभ किंवा अन्य समारंभ म्हटले की,घराघरात जाऊन आग्रहाने निमंत्रण पत्रिका देण्याची एक सौदार्य आणि समाजभान जपणारी परंपरा समाजात पाहायला मिळत असे.परंतु कौलाघात आज ती पंरपरा नष्ट होण्याची दाट निर्माण झाल्याने माणूस्कीच्या विनीतील एक धागा निसटून पडताना दिसत आहे.नातेवाईक,मित्रपरिवार आणि आप्तेष्टांना स्वतःभेटून आग्रहाचे निमंत्रण देण्यात एक वेगळी आत्मीयता आणि स्नेह असायचा.मात्र, बदलत्या काळानुसार ही परंपरा आता हळूहळू मागे पडताना दिसत असून समाज माध्यमातून लग्नाचे निमंत्रण देण्याचा ट्रेंड तुफान वाढत आहे.
सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लग्नपत्रिका छापण्याऐवजी आकर्षक डिजिटल कार्ड तयार करून काही सेकंदात शेकडो लोकांपर्यंत पोहोचविणे आता शक्य झाले आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ स्वरूपातील निमंत्रण, प्री-वेडिंग क्लिप,अॅनिमेटेड कार्ड्स आणि क्यूआर कोडसह आधुनिक निमंत्रण पत्रिकांना तरुणाईकडून मोठी पसंती मिळत आहे.
पूर्वी निमंत्रण देण्यासाठी अनेक दिवस खर्ची पडत असत.गावोगावी जाऊन नातेवाईकांना भेटणे,प्रवासाचा खर्च आणि वेळेचे नियोजन यामध्ये मोठी कसरत करावी लागत असे. आता मात्र मोबाईल वरील एका क्लिकमध्ये निमंत्रण पोहोचत असल्याने वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीनेही डिजिटल पत्रिका अधिक फायदेशीर मानल्या जात आहेत. कागदाचा वापर कमी होत असल्याने वृक्षतोड कमी करण्यास मदत होत असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. मात्र या बदलत्या ट्रेंडमुळे पारंपरिक आत्मीयता हरवत असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रत्यक्ष घरी जाऊन आग्रहाचे निमंत्रण देण्यात नातेसंबंधांमधील जिव्हाळा आणि स्नेहभाव दडलेला असतो, तो भाव अनेकदा डिजिटल संदेशांमध्ये दिसून येत नाही.काही ठिकाणी तर केवळ ग्रुपवर पत्रिका पाठवून औपचारिकता पूर्ण केली जात असल्याने नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात अजूनही घरोघरी जाऊन निमंत्रण देण्याची परंपरा काही प्रमाणात टिकून असली तरी शहरांमध्ये डिजिटल निमंत्रणाचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढले आहे. तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सोपे झाले असले तरी नात्यांमधील ऊब आणि माणुसकी टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे डिजिटल निमंत्रणाचा स्वीकार करतानाच जिव्हाळ्याच्या नात्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्याची परंपरा जपली गेली, तर आधुनिकता आणि संस्कृती यांचा सुंदर समन्वय साधला जाऊ शकतो,असे आवाहन समाजासमोर निर्माण झाले आहे.
