आरक्षण सोडतीत ११ पैकी ६ जागा महिलांसाठी आरक्षित!
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील पानोडी ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.या नव्या आरक्षणानुसार, सरपंचपदासह एकूण ११ सदस्यांच्या सभागृहात ६ महिला सदस्य असणार आहेत.यामुळे आगामी काळात पानोडी ग्रामपंचायतीवर खऱ्या अर्थाने 'महिला राज' येणार असल्याचे आता निश्चित झाले असून, ग्रामस्थांमध्ये या निर्णयाची मोठी चर्चा रंगली आहे.
नुकतेच गावातील हनुमान मंदिर प्रांगणामध्ये आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला काही ग्रामस्थांनी आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला,मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी सखोल चर्चा करून ग्रामस्थांचे समाधान केले.त्यानंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चिठ्ठ्या टाकून ही प्रक्रिया पार पडली.
या आरक्षण सोडतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी मदन शेवाळे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी अनिकेत मंडलिक आणि ग्रामसेवक सुरेंद्र ब्राम्हणे यांनी सहकार्य केले. पारदर्शक पद्धतीने चिठ्ठ्या काढून प्रभागांमधील आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग १, ३ आणि ४ मधील सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या, तर प्रभाग २ मध्ये अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण निश्चित झाले.
प्रभाग क्र. १: नागरिक मागास प्रवर्ग (स्त्री), सर्वसाधारण (स्त्री), सर्वसाधारण.प्रभाग क्र. २: अनुसूचित जाती (स्त्री), अनुसूचित जमाती (स्त्री).प्रभाग क्र. ३: सर्वसाधारण (स्त्री), सर्वसाधारण (स्त्री), सर्वसाधारण.प्रभाग क्र. ४: नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण),
यावेळी विद्यमान सरपंच गणपत हजारे दूध संघाचे संचालक विक्रम थोरात, मा.उपसरपंच अशोक तळेकर,नानासाहेब शिंदे,सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे, रामनाथ पवार,जालिंदर तळेकर, भारत शेवाळे, नानासाहेब कदम, संतोष चव्हाण ,दत्तात्रय चव्हाण,दिपक जाधव ,बाळासाहेब जाधव यांच्यासह गावातील तरुण कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.आरक्षण जाहीर झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून,महिलांसाठी ६ जागा आरक्षित झाल्यामुळे गावातील राजकारणात महिलांचा सहभाग आणि प्रभाव वाढणार आहे.आता केवळ प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा गावाला लागली आहे.
