-डॉ.सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
-तालुका गुणवत्ता यादीत तब्बल सहा विद्यार्थ्यांचे स्थान; सायन्स वर्कशॉप व इस्रो सहलीसाठी निवड
प्रवरानगर कोडींराम नेहे राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे.या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जिद्द, नियमित अभ्यास व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर उत्कृष्ट प्राविण्य संपादन करत तालुका गुणवत्ता यादीत तब्बल सहा विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.
आदर्श उनवणे
यामध्ये आदर्श अंबादास उनवणे व शिवानी राहुल थेटे यांनी ८२% गुण मिळवून संयुक्तपणे २ रा क्रमांक, आदित्य किरण वाघमारे व अल्फेज जुबेर शेख यांनी ८०% गुण मिळवून संयुक्तपणे ३ रा क्रमांक, मनिष महादेव कानडे याने ७६% गुण मिळवून ४ था क्रमांक तर अनुराग सुरेश डोंगरे याने ६८% गुण मिळवून तालुक्यात ५ वा क्रमांक पटकावला असून गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या या ६ विद्यार्थ्यांची सायन्स वर्कशॉप तसेच इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.
याशिवाय अलविरा अकिल बेग व दिया गुलाब बेग यांनीही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत शाळेच्या यशात भर घातली.या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री फटांगरे तसेच वर्गशिक्षिका श्रीमती मनिषा गावडे, महादेव कानडे व श्रीमती मनिषा सपकाळे या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विशेषतःइयत्ता पाचवीच्या वर्गाची जादा तासिका घेऊन शिक्षकांनी विविध स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेतल्याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत १ विद्यार्थ्याची तर सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत ६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल २६ विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा अधिक गुण मिळवत शाळेची अभिमानास्पद ओळख निर्माण केली आहे.
शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विशेष अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे जि. प.मार्फत राबविला जाणाऱ्या मिशन आरंभ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या नियमित सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मोठी मदत झाली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे तसेच जिल्हा परिषद मा. अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील यांनी अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे विशेष कौतुक केले आहे.
या यशामध्ये राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ तत्कालीन गट शिक्षणाधिकारी राजेश पावसे यांचे प्रेरणादायी प्रोत्साहन,तसेच शिक्षण विस्तार अधिकारी कांबळे केंद्रप्रमुख कोळेकर यांचे शैक्षणिक मार्गदर्शन मोलाचे ठरले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक,ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे प्रवरानगरच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक अधिक उंचावला असून विज्ञानविषयक शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
