पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा प्रयत्न करणार-आमदार अमोल खताळ

Cityline Media
0
जनतेच्या भावना राज्य आणि केंद्र सरकारकडे मांडणार.

संगमनेर प्रतिनिधी रेल्वे मंत्रालयाने दूरसंचार केंद्राचे कारण पुढे करत संगमनेर मार्गे प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे.हा रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर व्हावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  सर्वतोपरी प्रयत्न पुन्हा करणार आहे.संगमनेर तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेवून सर्वतोपरी संघर्षाची तयारी असल्याचा   निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रस्तावित संगमनेर मार्गे जाणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग रद्द केला. याबाबत माध्यमांशी बोलताना आ. खताळ म्हणाले की, दूरसंचार केंद्राने स्वतःरेल्वे मंत्रालयाला पत्र देऊन प्रस्तावित रेल्वे मार्गापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावरून मार्ग नेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते.असे असतानाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करणे ही संगमनेरकरांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.

या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया पार पडली होती. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या असून त्यांना शेकडो कोटी रुपयांची भरपाई देखील मिळाली आहे. प्रकल्पाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पुढे गेलेली असताना अचानक मार्ग बदलणे आणि अखेर प्रकल्पच रद्द करणे हे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी मोठा धक्का आहे. या निर्णयातील कायदेशीर बाबींचीही पडताळणी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागे-पुढे पाहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा 
"पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून संगमनेरसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.या रेल्वेमुळे औद्योगिक,शैक्षणिक, कृषी आणि व्यापारी क्षेत्रांना मोठा फायदा झाला असता.त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय फेरविचारासाठी लवकरच रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संगमनेरची भूमिका मांडली जाईल.
"आमदार- अमोल खताळ
संगमनेर विधानसभा 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!