मारहाण,लूट खंडणी प्रकरणात एलसीबीची कारवाई
पारनेर प्रतिनिधी मारहाण,लूटमार आणि खंडणीशी संबंधित गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून शोध घेत असलेल्या निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे.या कारवाईमुळे पारनेर तालुक्यासह सुपा एमआयडीसी परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा.लि.कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागप्रमुखांवर हल्ला करून त्यांची सोन्याची चैन हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीचा ठेका मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथील वैभव रामदास रिकामे याला संबंधित ठेका न मिळाल्याने नाराजी होती. त्यानंतर सतीश भालेकर यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
रुई छत्रपती फाटा परिसरात एचआर हेड महाडीक यांची दुचाकी अडवून आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच, सुपा एमआयडीसी परिसरात काम करण्यास मज्जाव करण्याच्या उद्देशाने धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटना दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र सतीश भालेकर फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता. अखेर स्थानिक गुन्हे पथकाने त्यांना ताब्यात घेतल्याने तपासाला गती मिळाली आहे.
दरम्यान,सुपा व म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील उद्योग व्यवस्थापक आणि व्यावसायिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे. कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली दमदाटी, दबाव, खंडणीची मागणी किंवा अन्य प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
