शोभायात्रा,समाजएकता आणि गुणवंतांचा सन्मान
सोनगाव शहाजी दिघे संगमनेर आणि राहुरी तालुक्यातील सिमेवर असलेल्या प्रवरा परिसर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने सोनगाव येथे महेश नवमी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील चणेगाव व राहुरी सोनगाव येथील राजस्थानी समाजाच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला प्रवरा परिसरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर केला.
भगवान महेश यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने संपूर्ण सोनगाव परिसर दुमदुमून गेला.
वाजंत्री पथकाच्या तालावर महिला, पुरुष, युवक आणि बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धार्मिक उत्साह अनुभवला.शोभा यात्रे दरम्यान परिसरातील विविध मार्गांवर समाजबांधवांनी स्वागताची व्यवस्था केली होती.
पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या महिलांनी आणि युवकांनी कार्यक्रमात वेगळी रंगत आणली.समाजातील ज्येष्ठांनी नव्या पिढीला महेश नवमीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व सांगत परंपरा जपण्याचा संदेश दिला.
यानंतर अमृतवाहिनी प्रवरा नदीकाठी धानोरे घाट येथे आनंद सोहळा आयोजित करण्यात आला.नदीकाठच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात समाजबांधवांनी एकत्र येत स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला.
या प्रसंगी सामाजिक संवाद, परस्पर सहकार्य आणि समाज संघटन यावरही चर्चा करण्यात आली. समाजातील एकोप्याचे दर्शन घडवणारा हा क्षण उपस्थितांसाठी विशेष ठरला.
त्यानंतर श्रीराम मंदिर येथे मुख्य कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक,स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे योगदानही यावेळी गौरवण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, संस्कार आणि संघटन यांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी स्वीकारून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
महेश नवमी हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाज एकत्र आणणारा आणि नव्या पिढीत संस्कार रुजवणारा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.धार्मिक परंपरा,सामाजिक सलोखा आणि गुणवंतांचा गौरव अशा त्रिसूत्रीवर आधारित हा महोत्सव प्रवरा परिसरासाठी संस्मरणीय ठरला.
