अज्ञात चोराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील शेतकरी प्रदीप नामदेव वाल्हेकर यांच्या शेतातील विहिरीवरून अज्ञात चोरट्याने ५ एचपी क्षमतेची विद्युत पाणबुडी मोटार वायर कापून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वी खुर्द येथील फिर्यादी प्रदीप नामदेव वाल्हेकर (वय ६३) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शेती व्यवसाय करतात.आश्वी खुर्द येथील गट नं. ११ मधील त्यांच्या शेतातील विहिरीवर त्यांनी ओ ५ व्ही जी ए आर नामांकित कंपनीची ५ एचपी क्षमतेची विद्युत पाणबुडी मोटार बसवली होती.
दि.१२ जून सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास त्यांनी विहिरीवरील मोटार चालू करून पिकांना पाणी भरले होते.पाणी भरून झाल्यानंतर मोटार बंद करून ते घरी निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १३ जून सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास वाल्हेकर हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीतील पाणी उपसण्याची पाईप रिकामा दिसला.
घडलेल्या घटनेचा संशय आल्याने त्यांनी विहिरीत खात्री केली असता, त्यांना बसवलेली विद्युत पाणबुडी मोटार दिसून आली नाही.अधिक जवळ जाऊन पाहणी केली असता,चोरट्याने मोटारीची केबल आणि पाईप कापून ती विहिरीतून चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. वाल्हेकर यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला,परंतु मोटार मिळून आली नाही.
अखेर त्यांनी आश्वी पोलीस ठाण्यात गाठून रीतसर फिर्याद दिली.त्यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस करत आहेत.
परिसरात शेती पंपांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत असून,अचानक मोटर चोरीमुळे व सध्या पावसाळा लांबल्याने पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होते ज्यामुळे उभे पिक जळून जाते त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
