नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात तरुणीचा गळा चिरून हत्या करून फरार झालेल्या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटनेबाबत समजलेले वृत्त असे की साहिल अशोक लावारे असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील रथचक्र चौकापासून जवळ असलेल्या वनसंपदा सोसायटीच्या प्रवेशद्वारा बाहेर वैष्णवी अनिल आवारे (वय २०) या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून संशयित साहिल अशोक लावारे (वय २६, रा. खडकपुरा, उमरखेड, यवतमाळ) याने चाकूने अचानक हल्ला करून तिचा गळा चिरून तिथून तो पळून गेला होता. रक्तस्त्राव अती झाल्याने वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी तपास सुरू केला असता इंदिरानगर येथील एका हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रॅक जवळ असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला आरोपी साहिलने गळफास घेतल्याचे दिसून आले.
याप्रकरणी गोपाल धरमदास बैरागी (वय २८) याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंकोलीकर करीत आहेत.
वैष्णवी ही इंदिरानगर परिसरात पेइंगेस्ट म्हणून रहात होती. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करुन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती.तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना आरोपी निष्पन्न झाला.मात्र त्याने गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन संपवले.
