वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपीवर 'मकोका'ची मागणी
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धडक कारवाई करत २२० लिटर बेकायदेशीर केमिकलयुक्त ताडी जप्त करून जागेवरच नष्ट केली. पुणे-नाशिक महामार्गालगत सुरू असलेल्या या अवैध ताडी अड्ड्यावर झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या काळ्या धंद्याविरोधात आता अधिक कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हे छापेमार पथक घारगाव येथे दाखल झाले. तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त ताडीचा साठा आढळून आला.पंचनामा करून २२० लिटर ताडी जागेवरच नष्ट करण्यात आली,तसेच संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात सुनीता शेख्याया गुत्तेदार (वय ४४, रा. घारगाव) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धक्कादायक बाब म्हणजे,गेल्या वर्षभरात संशयित आरोपीवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल झाले असून लाखो रुपयांचे बंधपत्र (बॉण्ड) मोडून पुन्हा त्याच अवैध व्यवसायात सक्रिय झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
घारगाव परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.वारंवार कारवाई होऊनही आरोपी पुन्हा त्याच ठिकाणी अवैध धंदा सुरू कसा करतात? कायद्याची भीती उरली नाही का?असा सवाल ग्रामस्थ करत कारवाई होते... पण धंदा पुन्हा सुरूच!'अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.वारंवार गुन्हे करूनही धंदा सुरू ठेवणाऱ्या आरोपींवर आता केवळ दारूबंदी कायद्याखाली कारवाई करून उपयोग नसल्याचे मत व्यक्त होत आहे. सवयीचे गुन्हेगार आणि अवैध व्यवसाय चालविणाऱ्या टोळ्यांवर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)' अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी घारगावसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घारगाव आणि बोटा परिसरात अवैध दारू, केमिकलयुक्त ताडी, प्रतिबंधित गुटखा तसेच गांजाची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.या बेकायदेशीर व्यवसायामुळे अनेक तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की,केवळ अधूनमधून छापे टाकून उपयोग होणार नाही. या अवैध धंद्यांच्या मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचून त्यांची आर्थिक साखळी उद्ध्वस्त केली,तरच हा काळाबाजार कायमचा बंद होईल.पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे सातत्याने मोहीम राबवून अशा अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी लगाम घालावा,अशी मागणी जोर धरत आहे.
घारगावातील कारवाई ही स्वागतार्ह असली, तरी वारंवार गुन्हे करूनही आरोपी पुन्हा त्याच व्यवसायात उतरतात,ही बाब गंभीर आहे.नागरिकांच्या आरोग्याशी आणि भविष्यासोबत खेळ करणाऱ्या अशा अवैध धंद्यांवर केवळ कागदोपत्री कारवाई न करता, कठोर कायदेशीर कारवाई करून मूळ रॅकेट उद्ध्वस्त करण्याची वेळ आता आली आहे. जनता आता कारवाईपेक्षा कायमस्वरूपी बंदोबस्ताची अपेक्षा व्यक्त करत आहे.
