लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील चंद्रपूर येथे ह भ प गुरुवर्य अण्णा महाराज गागरे यांचे सुमधुर कीर्तन पार पडणार आहे
शनिवार २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हनुमान मंदिर येथे या मंगल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर येथे आषाढ शुद्ध एकादशी उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात एकादशी कीर्तन उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्यानिमित्त परिसरातील ग्रामस्थांमध्ये व वारकरी संप्रदायामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
संपूर्ण गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.या भव्य धार्मिक महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह.भ.प. गुरुवर्य अण्णा महाराज गागरे (कानडगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांच्या सुमधुर वाणीतून हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
धर्माचे पालन करणे,पाखंड खंडन, हेचि आम्हा करणे काम, बिज वाढवावे नाम' या पवित्र संत वचनांची वीणा हातात घेऊन वारकरी संप्रदायाची महान परंपरा जोपासण्यासाठी व टिकवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा संपूर्ण धार्मिक सोहळा अखिलकोट ब्रह्मंडानायक पंढरी पांडुरंगाच्या असीम कृपेने तसेच योगिराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, गुरुवर्य तपोनिधि ब्रह्मलिन संत नारायणगिरीजी महाराज आणि ओम चैतन्य माणिकगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह.भ.प. महंत दत्तगिरीजी महाराज व ह.भ.प. परमहंस स्वामी मुक्तानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
चंद्रपूर पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांच्या विशेष संकल्पनेतून या किर्तन उत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ,तरुण मंडळ, ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय मोठ्या तन्मयतेने या उत्सवात सहभागी होत आहेत.
या पवित्र कीर्तन महोत्सवात कीर्तनासह संतपुजन तसेच उपस्थित भाविकांसाठी फराळ महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या फराळ महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून सौ. सुमन बबन मगर व सौ.आशालता आण्णासाहेब तांबे यांनी लाभ घेतला असून त्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.
संपूर्ण या धार्मिक कार्यक्रमाचे हरीचरण रज सेवक म्हणून ह.भ.प. मायराज महाराज अनर्थे, चंद्रपूरकर आपली निष्ठावान सेवा बजावत आहेत.चंद्रपूर परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविकांनी, वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी या भव्य एकादशी कीर्तन उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिकीर्तनाचा तसेच फराळ महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि या पावन व मंगलमय सोहळ्याची शोभा द्विगुणीत करावी,असे नम्र आवाहन चंद्रपूर पंचक्रोशीतील भजनी मंडळ, मित्र परिवार व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
