नाशिक दिनकर गायकवाड कुंभमेळ्यासाठी जेवण व पाण्याच्या तीन निविदा मिळवून देतो,असे सांगून भारत सरकारची राजमुद्रा असलेली बनावट वर्क ऑर्डर तयार करून देण्यात आली.त्याद्वारे तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.या प्रकरणी जळगावच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी किशोर जगदीश उपाध्याय (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे.आरोपी शकील अहमद सलीमुद्दीन शेख तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांनी संगनमत करून उपाध्याय यांना नाशिक कुंभमेळ्यासाठी जेवणाचे व पाण्याचे तीन निविदा मिळवून देतो, असे सांगितले.
आरोपींनी भारत सरकारची राजमुद्रा असलेली तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल स्वाक्षरी असल्याचे भासवणारी बनावट वर्क ऑर्डर तयार केली. ही वर्क ऑर्डर फिर्यादीला दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या अकाउंटवरून निविदा मिळवून देण्यासाठी पैसे घेतले.तनय महाजन यांच्या सीता ट्रेडर्सच्या अकाउंटवर १ कोटी ३४ लाख ५० हजार रुपये, तर शकील अहमद सलीमुद्दीन शेख यांच्या अकाउंटवर ५ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.अशा प्रकारे एकूण १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
तसेच फिर्यादीच्या नावाने जेवणाचे व पाण्याचे २६ कोटी रुपयांचे तीन निविदा मिळाल्याची बनावट वर्क ऑर्डर तयार करून ती फिर्यादीला देण्यात आली होती.या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
