झरेकाठी सोमनाथ डोळे लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत ‘स्वच्छता वारी, गाव स्वच्छता अभियान’ हा उपक्रम राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे उत्साहात राबविण्यात आला.
श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे नुकताच श्री पांडुरंग महोत्सव झाला. ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्री महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो विठ्ठलभक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी व सेवेसाठी दाखल झाले होते.यात्रेदरम्यान सुमारे दहा लाख भाविकांनी उपस्थिती नोंदविल्याने मंदिर परिसरासह गावातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदान करून मंदिर परिसर, रस्ते,सार्वजनिक ठिकाणे तसेच गाव परिसराची स्वच्छता केली. जमा झालेल्या घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठीही स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.यावेळी ग्रामस्थांना स्वच्छता,आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत ‘स्वच्छ व निरोगी गाव’ निर्माण करण्यासाठी सामूहिक सहभागाचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे ताहाराबाद परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केलेल्या श्रमदानाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
याप्रसंगी श्री संत कवी महिपती महाराज श्रीक्षेत्र ताहाराबाद देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे, अध्यक्ष राजेंद्र साबळे, सरपंच निवृत्ती घनदाट, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे,उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, समन्वयक प्रा.आर.डी. बोरसे, डॉ.बी.एन. नवले, प्रा.डी. एन. घाणे आणि कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र गव्हाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप राजभोज,प्रा. प्रतिभा विखे,डॉ. विजय शिंदे, सौ.वर्पे, डॉ. ई.एस.निर्मळ व श्री.कवडे यांनी विशेष परिश्रम घेत उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव,नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजहिताच्या कार्याला चालना देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
