लोकशाहीच्या स्तभांची ‌पवित्रता जपत जनहितार्थ निर्भिड प्रहार करणारे युवा पत्रकार महेश भोसले

Cityline Media
0
पुरोगामी चळवळीला पाठबळ देणारे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची पवित्रता जपत सामाजिक प्रश्नांवर निर्भीड प्रहार करणारे युवा पत्रकार महेश भोसले

जन्मदिन विशेषांक | २७ ऑगस्ट
संघर्षातून उभा राहिलेला पत्रकार... अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता... अपघाताच्या संकटावर मात करून फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा भरारी घेणारा एक जिद्दी माणूस... म्हणजे पत्रकार महेश भोसले!
संघर्षमय बालपणातून घडलेला जिद्दी युवक
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी या गावात भोसले कुटुंबात २७ ऑगस्ट १९८३ ला महेश भोसले यांचा जन्म झाला.वरवंडी गावात बाराही महिने दुष्काळ मग त्यांच्या आई-वडीलांनी प्रवरेच्या खोऱ्यात वसलेल्या चणेगाव येथे विस्थापित म्हणून जीवन जगले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत असताना महेश यांचे बालपण संघर्षातच गेले.आई वडीलांनी विटभट्टीवर काबाड कष्ट करून त्यांनी महेश आणि त्यांच्या भावंडांना शिकवले.प्रवराकाठच्या ‌अनेक विटभट्यावर त्यांचे आयुष्य गेले.धन्य ‌ते माता पिता ज्यांनी महेश भोसले सारख्या मुलाला जन्म दिला.परंतु चिखल मातीच्या कामाने त्यांच्या माता पित्याचे हात पाय दुर्दैवाने खिळखिळे झाले आहे त्या माता पित्यास नमन! घरची परिस्थिती जेमतेम असल्याने महेश यांनी लहानपणापासूनच परिस्थितीशी झुंज देत शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण चणेगाव येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणानंतर केंदळ येथे दहावी शिक्षण पुर्ण केले पुढे शिक्षणासाठी त्यांनी संगमनेर येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणाऱ्या ज्ञानमाता विद्यालयात प्रवेश घेतला.वसतिगृहात राहून अभ्यास करत त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासूनच महेश अत्यंत चुणचुणीत, अभ्यासू आणि नेतृत्वगुणांनी संपन्न होते.आपल्या सवंगड्यांमध्ये नेतृत्व करताना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली.छोट्या-मोठ्या संकटांना न घाबरता सामोरे जाण्याची ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनली.

शिक्षणातून विचारांची जडणघडण
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी लोणी प्रवरानगर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनातच सामाजिक व राजकीय प्रश्नांविषयी त्यांची उत्सुकता अधिक वाढत गेली आणि तिथेच त्यांना चळवळीचा टच झाला.महेश यांना वाचनाची प्रचंड आवड होती. विशेषतः शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी संबंधित साहित्य, दलित साहित्य, कादंबऱ्या आणि सामाजिक परिवर्तनाची पुस्तके त्यांनी मनापासून वाचली.या वाचनातून त्यांच्या विचारांना दिशा मिळाली आणि त्यांनी छोट्या-छोट्या लेखांमधून सामाजिक वास्तव मांडण्यास सुरुवात केली.आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातून पदवी पुर्ण केली पुढे अहिल्यानगर येथे पत्रकारिता शिक्षण पुर्ण करुन दैनिक सार्वमत मध्ये उपसंपादक म्हणून काही काळ नोकरी केली अनेक वृत्तपत्रांचा अनुभव घेऊन पुढे निघाले त्यांची लेखनशैली प्रभावी आहे इतक्साया गंभीर अपघातानंतर देखील त्यांची लिखाण शैली शाबूत आहे हे खरोखर विशेष सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर निर्भीडपणे भाष्य करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली.पुढे त्यांनी वृत्तपत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून पत्रकारितेलाच आपल्या जीवनकार्याचा मार्ग म्हणून स्वीकारले.

२००६ पासून सुरू झालेली खरी पत्रकारिता
महेश भोसले यांची सामाजिक भान असलेली पत्रकारिता खऱ्या अर्थाने २००६ पासून सुरू झाली.चाणाक्ष बुद्धी,चौकस वृत्ती, प्रचंड वाचन आणि सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास या बळावर त्यांनी संगमनेर आणि प्रवरा परिसरातील विविध प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली.

शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करत समाजातील अन्याय, अत्याचार, विषमता आणि वंचित घटकांच्या प्रश्नांची माहिती त्यांनी घेतली. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल, सर्वसामान्यांचा प्रश्न प्रलंबित असेल किंवा पीडितांना न्याय मिळत नसेल, तर त्या ठिकाणी जाऊन त्यांचा आवाज समाजासमोर मांडण्याचे काम महेश यांनी सुरू केले.

विविध वृत्तपत्रे आणि साप्ताहिकांमधून सामाजिक प्रश्न मांडत त्यांनी पत्रकारितेतील आपली वेगळी ओळख निर्माण केली.

चळवळीतील सहकाऱ्यांचा जिव्हाळ्याचा सहवास

या काळात महेश भोसले यांचा संपर्क चळवळीतील अनेक युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी आला. त्यामध्ये किशोर वाघमारे, विनोद गायकवाड रामनाथ बोराडे,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम, अशोकराव गायकवाड, सुखदेव भालेराव, अशोक बनसोडे, कैलास जमदाडे, नानाभाऊ वाघमारे, संदिप तथा बंटी यादव, विजय आढाव,राहुल यादव,अशोकराव टपले यांसारख्या अनेक सहकाऱ्यांशी त्यांचा विचारांचा संवाद वाढत गेला.

या चर्चा,बैठका आणि सामाजिक प्रश्नांवरील चिंतनातून महेश यांची सामाजिक जडणघडण अधिक मजबूत झाली. अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभे राहणे आणि त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हेच त्यांनी आपल्या पत्रकारितेचे ध्येय मानले.

एक वेगळी ओळख, एक आक्रमक पत्रकार
तरुणपणात महेश भोसले यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या चित्रपटातील नायकासारखे लक्षवेधी होते.फ्रेंच कट दाढी, डोळ्यांवर चष्मा,वैशिष्ट्यपूर्ण केशरचना, जॅकेट आणि बूट, पाठीवर बॅग आणि हातात कॅमेरा—ही त्यांची वेगळी ओळख अनेकांच्या स्मरणात आहे.पण हा केवळ पेहराव नव्हता; त्यामागे एक ध्येयवेडा पत्रकार होता. कॅमेरा आणि लेखणीच्या माध्यमातून सत्य समोर आणण्याची धडपड त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसत होती.
बहुजनांच्या प्रश्नांसाठी उभारले ‘भूगोल’चे व्यासपीठ
सन २००८ मध्ये महेश भोसले यांच्या मनात एक महत्त्वाचा विचार आला—“आपण स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले, तर बहुजन समाज, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना स्वतंत्र आणि हक्काचे व्यासपीठ मिळू शकते.”
याच विचारातून सुमारे १९ वर्षांपूर्वी ‘भूगोल’ या शासनमान्य वृत्तपत्राचा प्रवास सुरू झाला.प्रारंभी साप्ताहिक स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाने पुढे वार्षिक विशेषांक आणि नंतर दैनिक पत्रकारितेच्या दिशेने वाटचाल केली.महेश यांची पत्रकारिता आता स्वतःच्या अस्तित्वावर उभी राहिली होती.

छोट्याशा कार्यालयातून मोठ्या विचारांचा प्रवास
संगमनेर शहरातील शक्तिमान टॉवर परिसरात छोट्याशा कार्यालयातून ‘भूगोल’चा कारभार सुरू झाला.दिवसभर बातम्यांचे संकलन करणे, सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा करणे, डीटीपीच्या माध्यमातून बातम्या मांडणे आणि अंक तयार करणे—अशा अत्यंत मेहनतीच्या प्रक्रियेतून ‘भूगोल’ आकार घेत गेला.

त्या काळात आजच्या प्रमाणे सोशल मीडिया प्रभावी नव्हता.प्रिंट मीडियाचा खर्च मोठा होता. वृत्तपत्र चालविण्यासाठी जाहिरातींचे संकलन करणे आवश्यक होते.महेश यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे विविध मान्यवरांकडून जाहिराती मिळू लागल्या. वाढदिवस विशेषांक, विविध सामाजिक कार्यक्रम आणि विशेष प्रसंगी अंक प्रकाशित करून वृत्तपत्राचा आर्थिक गाडा पुढे चालू लागला.

या कठीण प्रवासात बंटी उर्फ संदीप यादव, सचिन साळवे, विजय आढाव आणि त्यांचे बंधू सोमनाथ भोसले यांनी त्यांना मोलाची साथ दिली.

सर्वसामान्यांचा आवाज बनलेले ‘भूगोल’
‘भूगोल’ हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर सर्वसामान्य, मागासवर्गीय आणि वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी उभे राहिलेले हक्काचे व्यासपीठ होते.

संगमनेरसारख्या परिसरातून सुरू झालेल्या या वृत्तपत्राची चर्चा पुढे संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली. समाजातील विविध प्रश्न मांडण्याबरोबरच समाजप्रबोधनाचे कामही ‘भूगोल’च्या माध्यमातून सुरू झाले.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक, छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेषांक, २६ जानेवारी विशेषांक, १५ ऑगस्ट विशेषांक, विविध मान्यवरांचे जन्मदिन विशेषांक अशा विविध उपक्रमांमधून महेश भोसले यांनी पत्रकारितेला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविले.

माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून प्रश्नांचा पाठपुरावा
माहितीचा अधिकार कायदा अधिक प्रभावीपणे वापरात येऊ लागल्यानंतर महेश यांनी या कायद्याला सर्वसामान्यांच्या न्यायासाठीचे प्रभावी हत्यार मानले.

ते गावोगावी जाऊन विविध समस्या समजून घेत. संबंधित यंत्रणांकडे प्रश्न उपस्थित करत. आवश्यक त्या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून प्रशासनासमोर प्रश्न उभे करत. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित न ठेवता, प्रश्नाच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याची प्रक्रिया त्यांनी स्वीकारली.

अपघात... जीवन-मरणाचा संघर्ष... आणि फिनिक्ससारखे पुनरागमन!
पत्रकारितेच्या कामानिमित्त सतत प्रवास करणाऱ्या महेश भोसले यांच्या आयुष्यात एक अत्यंत भीषण काळ आला. एका गंभीर अपघातात ते मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. अपघाताचे स्वरूप इतके भयंकर होते की त्यांच्या जीविताबाबतही चिंता निर्माण झाली होती.

या अपघातात त्यांना पायाला गंभीर दुखापत झाली, डोक्यालाही मोठा मार बसला. बोलणे, चालणे आणि फिरणे यासाठी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. पूर्णपणे सावरण्यासाठी दीर्घ काळ गेला.

२०१८ ते २०२० हा काळ त्यांच्या जीवनातील सर्वांत कठीण संघर्षाचा काळ ठरला. परंतु महेश भोसले यांनी परिस्थितीपुढे हार मानली नाही.

हळूहळू ते पुन्हा बोलू लागले. मित्रांशी संवाद साधू लागले. आपल्या आवडत्या वाचनाशी पुन्हा नाते जोडले. शरीरावर संकट होते, पण मनातील विचारांची आग मात्र कायम होती.

-

सिटीलाईन न्यूज’च्या माध्यमातून नव्या उमेदीची सुरुवात
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महेश यांनी पुन्हा एकदा पत्रकारितेच्या क्षेत्रात जोमाने पाऊल ठेवले. त्यांनी ‘सिटीलाईन न्यूज’ या माध्यमातून आपल्या विचारांना आणि सामाजिक प्रश्नांना नवे व्यासपीठ दिले.

आज शारीरिक अडचणी असतानाही हातात व्हिडिओ कॅमेरा घेऊन विविध प्रश्न, समस्या आणि घडामोडींचे चित्रीकरण करून ते लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. डिजिटल आणि व्हिडिओ पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा समाजातील वास्तव लोकांसमोर आणण्याचा ध्यास घेतला आहे.

‘सिटी लाईन न्यूज’सोबतच त्यांनी पुन्हा एकदा ‘भूगोल’च्या कार्यालाही नव्या उमेदीने गती दिली.


महेश भोसले म्हणजे एक ‘फिनिक्स’
फिनिक्स पक्ष्याची एक प्रेरणादायी कथा सांगितली जाते—तो संकटात जळून खाक झाला तरी पुन्हा राखेतून नव्या शक्तीने जन्म घेतो.महेश भोसले यांचा जीवनप्रवासही असाच आहे.

संघर्षमय बालपण...
प्रतिबंधांमध्ये झालेले शिक्षण...
सामाजिक प्रश्नांसाठी सुरू झालेली पत्रकारिता...
स्वतःचे वृत्तपत्र उभे करण्याची धडपड...
बहुजनांच्या प्रश्नांसाठी निर्माण केलेले व्यासपीठ...
भीषण अपघात...
दीर्घकाळाचा शारीरिक संघर्ष...
आणि त्यानंतर पुन्हा समाजासाठी उभे राहण्याची जिद्द...

म्हणूनच आज महेश भोसले यांच्याकडे पाहताना एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते—

“हा माणूस केवळ पत्रकार नाही; हा संकटातून पुन्हा उभा राहिलेला एक फिनिक्स आहे!”

---

बोनस लाईफ समाजासाठी

चळवळीतील माणूस स्वार्थासाठी नव्हे, तर समाजासाठी काम करतो. संकटांनी त्याला रोखले तरी त्याच्या विचारांचा प्रवास थांबत नाही. महेश भोसले यांनाही अपघातानंतर मिळालेले हे नवीन आयुष्य त्यांनी स्वतःपुरते मर्यादित न ठेवता पुन्हा समाजाच्या प्रश्नांसाठी वाहून घेतले आहे.

अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची वृत्ती आजही कायम आहे. वाचन, लेखन, पत्रकारिता आणि सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा या माध्यमातून ते आजही सर्वसामान्यांच्या बाजूने उभे आहेत.

---

जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

पुरोगामी चळवळीला पाठबळ देणारे,
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची पवित्रता जपणारे,
शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांशी निष्ठा ठेवणारे,सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे प्रहार करणारे,सर्वसामान्य आणि वंचितांच्या आवाजाला व्यासपीठ देणारे,संकटावर मात करून फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा भरारी घेणारे
युवा पत्रकार महेश भोसले यांना जन्मदिनानिमित्त मंगलमय, आरोग्यदायी आणि प्रेरणादायी आयुष्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
"आपली लेखणी सदैव अन्यायाविरुद्ध तळपत राहो आपला कॅमेरा सत्याचे दर्शन घडवत राहो...
आणि आपला जीवनसंघर्ष असंख्य युवकांना प्रेरणा देत राहो...!

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

पत्रकार महेश भोसले यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!

शब्दांकन प्रा.रमेश रुपवते,संगमनेर
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!