नाशिक दिनकर गायकवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वेळोवेळी टपरी हटविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत नाशिक येथील दिव्यांग महिला सुरैया कासम पटेल आणि विधवा दिव्यांग प्रविणा प्रशांत उदयपूरम या महिलांनी शांततामय बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
मनपा प्रशासनाकडून टपरी काढण्यासाठी वारंवार कारवाईचा प्रयत्न होत असल्याने आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.या कारवाईला विरोध करत “न्याय मिळेपर्यंत शांततामय बेमुदत उपोषण” करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
उपोषणस्थळी महिला आणि मुली बसल्या असून, प्रशासनाने आपली बाजू ऐकून घेऊन योग्य तो तोडगा काढावा,अशी मागणी करण्यात येत आहे. टपरी हटविण्यापूर्वी संबंधितांना योग्य ती संधी द्यावी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा,अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.दरम्यान,या उपोषणाची दखल घेऊन नाशिक महानगरपालिका प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते आणि कारवाईबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.
