झरेकाठी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी परिसरातील ऐतिहासिक श्री.क्षेत्र दुधेश्वर गडावर श्रावण महिन्यात भाविक आणि ट्रेकर्सची मोठी वर्दळ वाढली आहे. मात्र, श्रद्धेने गडावर येणाऱ्या भाविकांकडून प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग व इतर कचरा परिसरात टाकला जात असल्याचे चित्रही दिसून येते. यामुळे गडाचे पावित्र्य आणि निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आश्वी परिसरातील ग्रुपने ‘स्वच्छ दुधेश्वर’चा प्रेरणादायी उपक्रम नुकताच हाती घेतला आहे.
आश्वी परिसरातील ज्येष्ठ पत्रकार सिताराम चांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोडोलीकर,निसर्गप्रेमी शिक्षक संजय देशमुख, शकील शेख,गणेश भोसले,अभय वाळेकर, रविंद्र भोसले,अमोल गागरे, संजय खरात, सुनील गायकवाड, रोहिदास माळी, संजय भोसले, शहाबापु खेमनर, डॉ.अनिल बालोटे,राजेंद्र गायकवाड, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, विजयराव डेंगळे ,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे, सुमित डेंगळे,बाबासाहेब डेंगळे विकास ढगे,नंदू डेंगळे,वैभव बिडवे यांचा हा ग्रुप श्रावण महिन्यात दररोज पायी दुधेश्वर गडावर जात आहे.
गडावर दर्शन घेतल्यानंतर परतीच्या वाटेवर हा ग्रुप भाविकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग तसेच इतर कचरा स्वतः गोळा करून गडाच्या पायथ्याशी जमा करतो.कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नित्यनेमाने सुरू असलेल्या या उपक्रमातून ‘देवाची सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर देवस्थान आणि निसर्गाची स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’असा संदेश दिला जात आहे.श्रद्धेच्या ठिकाणी स्वच्छतेची जबाबदारीही आपलीच दुधेश्वर गडाला ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक महत्त्व आहे. हजारो भाविक आणि ट्रेकर्स या ठिकाणी येत असताना प्रत्येकाने स्वतःसोबत आणलेला कचरा पुन्हा सोबत घेऊन जाणे किंवा उपलब्ध कचराकुंडीत टाकणे आवश्यक आहे. एका बाजूला गडाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी होत असताना दुसरीकडे गड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही प्रत्येक भाविकाने स्वीकारणे गरजेचे आहे.
-स्वच्छता हिच खरी दुधेश्वर सेवा
दुधेश्वर गड हा आपला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. देवदर्शनासाठी येताना गडावर कचरा करणे ही आपल्या श्रद्धेलाच शोभणारी बाब नाही. प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग किंवा कोणताही कचरा गडावर टाकू नका. शक्य असल्यास स्वतःचा कचरा स्वतःसोबत घेऊन जा.गड स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे.आम्ही दररोज कचरा गोळा करून छोटासा प्रयत्न करत आहोत; या उपक्रमाला प्रत्येकाने साथ द्यावी.
स्वच्छता हीच खरी दुधेश्वर सेवा!
दर्शनासाठी या, निसर्गाचा आनंद घ्या;
पण गडावर कचरा करू नका.
-सिताराम चांडे,ज्येष्ठ पत्रकार
