लोणी रुपाली भालेराव जलसंधारण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना सक्षम बाजारपेठ उपलब्ध झाली असून,राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती ही आज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे,अशी भावना सरस्वती महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा सौ.मीना निर्मळ यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ, समाधानकारक भाव आणि थेट विक्रीची संधी उपलब्ध झाली तर शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, या उद्देशाने सरस्वती महिला शेतकरी गट, पिंपरी निर्मळ यांच्या वतीने राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट देण्यात आली.
गटाच्या अध्यक्षा सौ.मीना निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी बाजार समितीच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी बाजार समितीचे सचिव श्री.मोटे यांनी महिलांना बाजार समितीची रचना,व्यापारी व्यवस्था,लिलाव प्रक्रिया,शेतीमालाची आवक-जावक तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावाबाबत सखोल मार्गदर्शन केले.
विविध प्रकारचा भाजीपाला,धान्य, कांदा,डाळिंब आदी शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून,मोठ्या व्यापारी वर्गामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ आणि चांगला भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकारचा भाजीपाला आणि नगदी पिकांचे उत्पादन घेतले,तर शेती अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते,” असे सांगत श्री.मोटे यांनी महिलांना पीक नियोजन आणि बाजारपेठेच्या अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.
या भेटीवेळी बाजार समितीचे सभापती आबा गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, निरीक्षक श्री.भावसार, सचिव तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी महिला शेतकरी गटाच्या उपक्रमाचे कौतुक करून महिलांनी आधुनिक शेतीकडे वळावे आणि बाजारपेठेचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
महिलांनी बाजार समिती परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी,व्यापारी आणि बाजार समितीतील विविध घटकांशी संवाद साधला.धान्य,कांदा, डाळिंब,डाळी आणि विविध प्रकारच्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर होणारी आवक-जावक पाहून महिलांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना अध्यक्षा सौ.मीना निर्मळ म्हणाल्या की, “आतापर्यंत मोठी बाजारपेठ जवळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.मात्र आता राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी सक्षम बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
यापुढे आमच्या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि बाजारपेठेत मागणी असलेली पिके घेऊन आर्थिक प्रगती साधतील.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,ना. राधाकृष्ण विखे पाटील,सौ.शालिनीताई विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा आणि सक्षम बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात आलेली राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती आज राज्यातील आदर्श बाजार समित्यांपैकी एक म्हणून ओळखली जात असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहे.
महिला शेतकरी गटाच्या या भेटीमुळे बाजारपेठाभिमुख शेती, पीक नियोजन आणि शेतीमालाच्या थेट विक्रीबाबत महिलांमध्ये नव्या आत्मविश्वासाची निर्मिती झाली असून, शेतकरी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
