पारनेर प्रतिनिधी तालुक्यातील करंडी येथील अंध महिला तहसील कार्यालयात हेळसांड झालेल्या दिव्यांग,अंध,वयोवृद्ध महिला श्रीमती हिराबाई धृपद भालेकर यांचा फोटो सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रेरणेने मनसेने तात्काळ धाव घेतली.आणि महिलेस आधार दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार,तालुका सचिव नारायण नरवडे,पारनेर शहराध्यक्ष सतीश म्हस्के, विशाल गवळी यांच्या शिष्टमंडळाने करंडी गावचे सरपंच भास्कर गव्हाणे यांना सोबत घेऊन थेट हिराबाई भालेकर यांच्या घरी जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांचे बंद असलेले रेशन चालू करून स्वस्त धान्य दुकानदार बाबाजी ठाणगे यांच्याकडून शिधा अंध वयोवृद्ध मावशी,त्यांची मुलगी, नात गौरी भालेकर आणि छोट्या मुलांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी महिला आणि नात गौरी यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहायला मिळाले.
या प्रसंगी सरपंच भास्कर गव्हाणे यांनी माणुसकीचे दर्शन घडवत,जोपर्यंत अंध महिलेचे घरकुल पूर्ण होत नाही,तोपर्यंत त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या खोलीची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सत्तेत नसतानाही सामान्य माणसाला न्याय मिळवून देता येतो,हे मनसेने पुन्हा एकदा आपल्या कृतीशील कार्यातुन दाखवून दिले आहे.
