पिंपरी निर्मळच्या महिलांनी श्रमदानातून उभा केला पानंद रस्ता
लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे एकीची ताकद काय असते आणि महिला एकत्र आल्यास कोणतीही कठीण गोष्ट शक्य होऊ शकते,हे येथील सरस्वती महिला शेतकरी गटाच्या महिलांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.अध्यक्षा सौ.मीना निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली पाणी फाउंडेशन,उमेदमार्फत आणि कृषी विभागाच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून या महिलांनी शेती सोबतच गावाच्या विकासातही मोठी आघाडी घेतली आहे. शेतात ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या पानंद रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी या महिलांनी मोठा खर्च टाळून स्वतःपुढे येण्याचा निर्णय घेतला.सर्व महिलांनी एकत्र येत श्रमदान केले आणि आपल्या कष्टाच्या बळावर पानंद रस्ता यशस्वीपणे तयार केला आहे.कोण म्हणतं की महिला फक्त घर सांभाळतात? या महिलांनी घरही उत्तम प्रकारे सांभाळले आहे.
शेतीची कामेही केली आहेत आणि गरज पडताच गावाच्या विकासासाठी फावडे-घमेले हातात घेऊन रस्ताही बनवून दाखवला आहे.जी महिला अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंब सांभाळू शकते,ती महिला कितीही अडचणी आल्या तरी प्रत्येक संकटावर मात करू शकते,याचे एक उत्तम आणि अनोखे उदाहरण या महिलांनी घालून दिले आहे.
या सर्व महिला एकत्र आल्यामुळे शासनाचा किंवा स्वतःचा होणारा अतिरिक्त आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला असून,आता शेतात ये-जा करणे अत्यंत सोयीचे झाले आहे.त्यांच्या या अभूतपूर्व एकजुटीमुळे केवळ एक रस्ता तयार झाला नाही,तर गावात परस्पर सहकार्य, आत्मविश्वास आणि सामूहिक विकासाची एक नवी पायरी तयार झाली आहे.
एकाची साथ,कष्टाची जोड आणि विचारांची आवश्यक कृती या दोन्ही गोष्टी एकत्र असल्या की प्रगती निश्चित होते,हेच या महिलांनी दाखवून दिले असून,सरस्वती महिला शेतकरी गट,पिंपरी निर्मळ यांचा हा उपक्रम संपूर्ण परिसरासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
