नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील न्यू स्टार मित्र मंडळ यांच्या वतीने मातंग आणि बौद्ध समाजाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात माजी न्यायाधीश तथा लेखक अनिल वैद्य हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.प्रसंगी आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, "समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता,बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर ठाम राहून अनुसूचित जातींचे ऐक्य टिकवणे ही काळाची गरज आहे."
प्रमुख वक्ते डॉ. प्रवीण गांगुर्डे यांनी यावेळी सांगितले की, "अनुसूचित जातींना अस्पृश्यतेच्या समान अनुभवाच्या आधारावर घटनात्मक आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणे ही संविधानाच्या मूळ उद्देशाला बाधा आणणारी बाब आहे."
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रविराज सोनवणे यांच्या हस्ते माजी न्यायाधीश अनिल वैद्य लिखित "उपवर्गीकरण, क्रिमीलेअर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका" या पुस्तकाच्या १०० प्रती मातंग आणि बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना वितरित करण्यात आल्या.
या उपक्रमाचे पंचक्रोशीत विशेष कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू स्टार मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा मातंग समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शरद बत्तीसे होते.अध्यक्षीय भाषणात त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवित समाजाच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी वैभव शार्दुल, विशाल जाधव, विवेक बागुल,साहिल पगारे, साहिल सोनवणे, स्वप्निल गांगुर्डे, राहुल गांगुर्डे,सरपंच संगीता देशमुख,
सदस्य सोनू देशमुख तसेच परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते,महिला,युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन द.भा.सोनवणे गुरुजी यांनी केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य, समता आणि संविधाननिष्ठ समाजनिर्मितीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.
