शिर्डीतील सुनियोजित क्रीडा शिक्षक सहविचार सभेचा राज्याने आदर्श घ्यावा

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शालेय क्रीडा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी क्रीडा शिक्षकांमध्ये विचार विनिमय,समन्वय आणि आगामी क्रीडा उपक्रमांचे नियोजन व्हावे, या उद्देशाने श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल,शिर्डी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची क्रीडा शिक्षक सहविचार सभा नुकतीच शिर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सभेला कोपरगाव व राहाता तालुक्यातील १२५ हून अधिक क्रीडा शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा कशा पद्धतीने नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे आयोजित करता येते, याचे उत्तम उदाहरण या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळाले.

श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलने केलेले उत्कृष्ट नियोजन,संस्थेचे सहकार्य आणि शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत यामुळे सभेला अमोघ महत्त्व प्राप्त झाले.शालेय क्रीडा क्षेत्रासमोरील विविध विषय,आगामी स्पर्धांचे नियोजन,खेळाडूंना उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधा तसेच क्रीडा शिक्षकांची भूमिका याबाबत या निमित्ताने सकारात्मक वातावरणात विचारविनिमय झाला.

शिर्डी संस्थानाला लाभलेले मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे कला व क्रीडाप्रेमी अधिकारी म्हणून विशेष ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये कला आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मागील आठवड्यातच साईबाबांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.त्यानंतर आता क्रीडा शिक्षकांच्या सहविचार सभेच्या माध्यमातून शालेय क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

या संपूर्ण उपक्रमामागे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचा विशेष पुढाकार आणि नेतृत्व महत्त्वाचे ठरत आहे.श्री.गाडीलकर यांच्या मार्गदर्शनातून आणि पुढाकारातून क्रीडा शिक्षकांची ही सहविचार सभा आयोजित करण्यात आली.

जिल्ह्यातील शालेय क्रीडा क्षेत्राला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे आणि क्रीडा शिक्षकांमध्ये समन्वय वाढावा,या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रयत्नांचे उपस्थित क्रीडा शिक्षकांनी कौतुक केले.

विशेष म्हणजे याच सहविचार सभेतून  गोरक्ष गाडीलकर यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शिर्डीच्या पवित्र भूमीत १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा श्रीगणेशा झाला आहे.

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी पार्थ दोशी यांच्या पुढाकाराचीही या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साईबाबांच्या पवित्र भूमीत देशभरातील युवा व्हॉलीबॉल खेळाडू एकत्र येणार असल्याने शिर्डीच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब ठरणार आहे.

कलेनंतर क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व देत श्री.गाडीलकर यांनी शिर्डीमध्ये राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाची दिशा निश्चित करून आपल्या कला-क्रीडाप्रेमी कार्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.मागील आठवड्यात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून कला व वक्तृत्वाला व्यासपीठ मिळवून दिल्यानंतर आता राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून शालेय क्रीडा क्षेत्राला राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.त्यामुळे शिर्डीच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी हा काळ निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनामुळे शिर्डी, कोपरगाव,राहाता आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा व्हॉलीबॉल खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि संघांना प्रत्यक्ष पाहण्याची तसेच मोठ्या स्पर्धेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. शालेय व्हॉलीबॉलच्या विकासासाठी हा उपक्रम निश्चितच मैलाचा दगड ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या सहविचार सभेच्या आयोजनात राष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक राजेंद्र कोहाकडे यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. तीन तपांपेक्षा अधिक काळ क्रीडा क्षेत्रासाठी आणि विशेषतः व्हॉलीबॉल खेळासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या कोहाकडे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन प्रभावीपणे केले. त्यांच्या सुमधुर सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

शालेय क्रीडा क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि व्हॉलीबॉल खेळाविषयीची निष्ठा यामुळे आगामी राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठीही त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे उपकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे,

अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे,प्रशासकीय अधिकारी  संदीपकुमार भोसले,प्रभारी प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या स्वप्ना जगताप, मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे,  विशाल जगताप संतोष वाबळे,प्रियांका खंडारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कोमल वाळके, राष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक राजेंद्र कोहाकडे यांच्यासह कोपरगाव व राहाता तालुक्यातील मोठ्या संख्येने क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने चीन येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल गौरव अरविंद डेंगळे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

या सहविचार सभेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री साईबाबा संस्थान, जिल्हा क्रीडा कार्यालय,श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. १२५ हून अधिक क्रीडा शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग, कला-क्रीडाप्रेमी प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाची मिळालेली दिशा यामुळे शिर्डीतील ही क्रीडा शिक्षक सहविचार सभा राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरावी आणि अशा सहविचार सभा राज्यभर नियमितपणे आयोजित व्हाव्यात,अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!