सिताफळ,रामफळासह मौल्यवान झाडांची बेकायदेशीर कत्तल - मनसे आक्रमक
पारनेर प्नतिनिधी शासन एकीकडे "एक झाड आईच्या नावाने" आणि "झाडे लावा झाडे जगवा" असा नारा देत असताना दुसरीकडे पारनेर शहरातील शासकीय कार्यालयातच हिरव्यागार झाडांची निर्दयीपणे कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पारनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारातील सिताफळ,रामफळ सारखी फळझाडे आणि इतर सावली देणारी झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत.झाडांची छाटणी करण्याच्या नावाखाली अक्षरशःअर्धवट झाडे तोडून ती तशीच जमिनीवर टाकून देण्यात आली आहेत.
या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणी मनसेने वन विभागाला कडक निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ही केवळ वृक्षतोड नसून ही पर्यावरणाची हत्या आहे.एक झाड वाढायला १५ वर्ष लागतात.
सरकारी अधिकाऱ्यांनीच जर कायद्याची पायमल्ली करून अशी वृक्षतोड केली असेल तर हा महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमाचा भंग आहे. या झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेतली आहे का? नसेल घेतली तर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा."
मनसेचा इशारा - ४८ तासात कारवाई नाही तर आंदोलन
या प्रकरणाची ४८ तासाच्या आत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वन विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल असा थेट इशारा अविनाश पवार यांनी दिला आहे. तसेच तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात १० झाडे लावण्याची सक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे पारनेर तालुक्यात संतापाची लाट पसरली असून प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
