श्रीरामपूर दिपक कदम राहाता पुणतांबा येथे कामिका एकादशीच्या पूर्वसंध्येला नुकतेच लिट्ल एंजल्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने भक्तिमय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. होते.
शाळेच्या वतीने विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन संस्थेच्या विश्वस्त डॉ.सौ.धनश्री धनवटे, उपाध्यक्ष राहुल धनवटे तसेच संचालिका व प्राचार्या सौ.वैजयंती राहुल धनवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
पूजनानंतर पालखी-दिंडी श्री पावन क्षेत्र योगिराज संत चांगदेव महाराज समाधी मंदिर, पुणतांबा येथे नेण्यात आली. हातात भगव्या पताका आणि झेंडे घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. "जय जय रामकृष्ण हरी", "ज्ञानोबा-तुकाराम" या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
टाळ-मृदंगांच्या गजरात निघालेल्या या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. मार्गातील विविध चौकांमध्ये विद्यार्थ्यांनी धार्मिक पथनाट्य, पावली आणि रिंगण , विविध संतांच्या वेशभुषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.भक्ती,कला आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला.
दिंडीचे आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे शुभ्र पांढरा घोडा.पालखी समवेत डौलाने चालणाऱ्या या घोड्यामुळे दिंडीच्या पारंपरिक सौंदर्यात अधिकच भर पडली. भगव्या पताकांनी सजलेले रस्ते,पांढऱ्या शुभ्र पोशाखातील विद्यार्थी, शिक्षक तसेच टाळ-मृदंगांचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर यामुळे पुणतांब्याच्या रस्त्यांवर जणू पंढरीची वारीच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.
या उपक्रमामागील उद्देश केवळ धार्मिक उत्सव साजरा करणे एवढाच नसून, विद्यार्थ्यांना संतपरंपरा,भारतीय संस्कृती,अध्यात्म आणि संस्कारांची ओळख करून देणे हा होता.शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृतीविषयी अभिमान आणि मानवतेविषयी प्रेम निर्माण व्हावे, या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरला.
दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि सर्वांच्या सहकार्यामुळे सोहळ्याला भक्तिमय व उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.धनंजय धनवटे ,डॉ. सौ.धनश्री धनवटे, मनोज धनवटे, सौ. मनिषा धनवटे, संस्थेचे उपाध्यक्ष.राहुल धनवटे,संचालिका सौ. वैजयंती धनवटे, शाळेचे अध्यक्ष दिपक धनवटे, उपाध्यक्ष दिपक नाईक तसेच संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आणि पालक वर्गांनी या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासा सोबतच संस्कृती आणि संस्कारांची जोड देण्याची संस्थेची परंपरा या उपक्रमातून अधोरेखित झाली. ज्ञानाच्या मंदिरातून निघालेली संस्कारांची ही पालखी, विठ्ठल नामाच्या गजरात संतांच्या चरणी पोहोचली हा अनुभव विद्यार्थ्यांसह उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात भक्तीची आणि संस्कारांची सुंदर ज्योत प्रज्वलित करणारा ठरला.
