मी कायद्याचा सन्मान करतो म्हणून शांत, आमदार अमोल खताळांची पत्रकार परिषद
संगमनेर प्रतिनिधी मी कायद्याचा सन्मान करतो म्हणून आतापर्यंत शांत आहे. मात्र संगमनेरचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून,विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला आहे.आता मात्र मी शांत बसणार नाही.या प्रकारामागे कोण आहे, याचा शोध देखील मी घेतला आहे असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सामाजिक माध्यमांवरून आपल्याला सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर नोटीस बजावून गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी विरोधात भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट केली जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. पराभव जिव्हारी लागल्यामुळेच हे उद्योग सुरू असल्याचे दिसते.संबंधित व्यक्तीशी माझे कोणतेही संबंध नाहीत.त्याच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार नाही. हा प्रकार मी आमदार होण्यापूर्वीचा आहे; मात्र मी आमदार झाल्यानंतरच तो उकरून काढण्यात आला आहे.
मला कोणालाही एक रुपयाचे देणे नाही आणि कोणाकडून एक रुपया घेणेही नाही.संबंधित व्यक्ती शेअर बाजारात आर्थिक अडचणीत सापडली आहे.मात्र या संपूर्ण प्रकरणामागे राजकीयदृष्ट्या कोण कोण आहे,याचाही मी शोध घेतला आहे.या प्रकरणात पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
संबंधित व्यक्तीच्या हालचालींबाबत पोलिसांना माहिती असताना त्याच्यावर योग्य वेळी कारवाई का झाली नाही? माझे खांडगाव येथे जाणे पोलिस प्रशासनाला माहिती होते.तरीही संबंधित व्यक्तीला ताब्यात का घेतले नाही? पोलिसांची गोपनीय शाखा नेमके काय करत आहे, याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली. संबंधित व्यक्तीचे मोबाईल ताब्यात घेऊन त्याचे दूरध्वनी संपर्क तपशील तपासावेत. संबंधित व्यक्तीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन दाद देखील मागणार आहे.
सामाजिक माध्यमांवरून सातत्याने मला लक्ष्य केले जात आहे. या प्रकारामागे कोण आहे, हे मी शोधून काढले आहे. संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठविण्यात येईल आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.माझे कार्यकर्तेही माझ्यासाठी सक्षम आहेत; मात्र मी कायद्याच्या मार्गानेच पुढे जाणार आहे. असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
