लोणी रुपाली भालेराव शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि लाडका आणि उत्साही सण असलेल्या कृषक भुमीचा बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर राहता लोणी बाजारपेठेत बैलपोळा साहित्याच्या खरेदीसाठी पंचक्रोशीतून ग्राहक व विक्रेते दाखल झाले होते.मात्र,यंदाच्या वर्षी दुष्काळाच्या सावटामुळे शेतकऱ्यांमध्ये सणाचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे चित्र बाजारात स्पष्टपणे पाहायला मिळाले.
बैलपोळ्या निमित्त बैलांसाठी लागणारे सजावटीचे साहित्य, रंग,गोंडे,झुली, विविध रंगी दोर, तसेच पूजेचे साहित्य विक्रीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे.ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये खरेदी-विक्रीचा सोहळा दिसत असला,तरी दरवर्षीच्या तुलनेत 'शेतकरी राजा' मात्र बाजारात खूपच कमी प्रमाणात दिसून आला.
पावसाने पाठ फिरवली त्याचा थेट परिणाम शेती व्यवसायावर गंभीर झाला असून,त्याचा ताण आणि परिणाम सणाच्या खरेदीवरही स्पष्टपणे जाणवत आहे.या सर्व परिस्थितीमुळे बैलपोळा सणाची पारंपरिक भव्यता आणि उत्साह कायम असला, तरी ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्साहावर आणि खरेदीवर मोठी मर्यादा आल्याचे दिसून आले आहे.
लोणी बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची तुटपुंजी गर्दी झाली असून, एकूणच ग्राहक आणि विक्रेत्यांमध्येही पूर्वीसारखा उत्साह कमी झाल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
