संगमनेर साखर कारखाना कारभाराची चौकशी व्हावी

Cityline Media
0
शेतकरी नेते संतोष रोहम यांची सहकार मंत्री व आयुक्तांकडे मागणी

संगमनेर प्रतिनिधी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या प्रश्नांवरून शेतकरी नेते संतोष रोहम यांनी संगमनेर येथील कारखाना प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
सभासदांनी सभेत कोणते प्रश्न विचारायचे,याची माहिती पाच दिवस अगोदर द्यावी,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र,सभेच्या केवळ दोन दिवस आधी सभासदांना अहवाल प्राप्त झाला.त्यामुळे कारखाना प्रशासनाला सभासदांचे प्रश्न ऐकून घ्यायचे आहेत की केवळ अहवाल मंजूर करून घ्यायचा आहे, असा सवाल शेतकरी नेते संतोष यांनी उपस्थित केला.

येथील शासकीय विश्रामगृहात नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून ते बोलत होते.यावेळी दीपक वाळे,रमेश शिंगोटे, विठ्ठल घोरपडे, नामदेव गुंजाळ, राजेंद्र सोनवणे, गुलाब भोसले, गोपीनाथ रुपवते शंकर वाळे  यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसंगी पुढे बोलताना रोहम म्हणाले, की मागील वर्षी पत्रकारांच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर ऊस उत्पादकांना ३० किलो साखर मिळाली. यावर्षी प्रत्येक सभासदाला ५० किलो साखर मिळाली पाहिजे. तसेच राजकीय कारणांमुळे जे ऊस उत्पादक सभासद होऊ शकले नाहीत, अशा ऊस उत्पादकांनाही ३० किलो साखर देण्यात यावी.
कारखाना प्रशासनाने विविध कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्यातील दोन कोटी रुपये बाथरूमसाठी खर्च केल्याचा दावा रोहम यांनी केला आहे.

सभासदांच्या पैशातून इमारती उभारल्या जात असतील आणि त्या इमारतींचा सभासदांना प्रत्यक्ष फायदा होत नसेल, तर अशा इमारती कशासाठी उभारल्या जात आहेत,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संगमनेर साखर कारखान्याच्या कारभाराबाबत लवकरच मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि सहकार आयुक्तांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून कायदेशीर लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला. कारखान्याने सभासदांच्या वारसांची नोंद करावी,अशी मागणी करताना रोहम यांनी दीड लाख पोती साखरेचा हिशेब मिळत नसल्याचा आरोप केला.हा गंभीर प्रकार असून सभासदांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.

दूध संघाच्या वार्षिक सभेत दूध उत्पादकांचा रिबीट व अनामत जाहीर करावी तसेच साखर कारखान्याने राज्यातील ऊस उत्पादकांना सर्वोच्च दर देण्यासाठी प्रयत्न करावेत. नुसत्या इमारती बांधल्याने संस्था मोठी होत नाही. निवडणुका आल्या की संस्था नंबर एक असल्याचे सांगितले जाते; मात्र सहकारी संस्था कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसून सामान्य सभासदांच्या मालकीच्या आहेत. संगमनेर साखर कारखाना सहकारी राहिला नसून तो खासगी कंपनीप्रमाणे चालविला जात आहे.

कारखाना उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा वार्षिक अहवालात योग्य उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.भोजापूर चारी व साकूर पठारचा पाणीप्रश्न मार्गी लागणार भोजापूर चारीचा पाणीप्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित होता.तसेच साकूर-पठार भागाचा पाणीप्रश्न सोडविण्याचा ध्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात या भागामध्ये पाणी पोहोचविण्यासोबतच एमआयडीसी उभारणीचा प्रश्नही मार्गी लागेल,असेही संतोष रोहम यांनी सांगितले.

-साखर उत्पादनाच्या आकडेवारीवर रोहम यांचा आक्षेप
चालू गळीत हंगामात ७ लाख ६५ हजार २६१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून साखरेचा उतारा ११.४२ टक्के इतका राहिला. या उताऱ्यानुसार सुमारे ८ लाख ७३ हजार ९२८ क्विंटल साखर तयार होणे अपेक्षित होते, असा दावा रोहम यांनी केला.मात्र, साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालात ७ लाख २४ हजार क्विंटल साखर तयार झाल्याची नोंद असल्याचे रोहम  यांनी सांगितले. त्यामुळे अपेक्षित उत्पादन आणि अहवालातील नोंद यामध्ये सुमारे १ लाख ४९ हजार ९२८ क्विंटलची तफावत असल्याचा दावा त्यांनी केला.चालू बाजार भावानुसार या तफावतीची किंमत सुमारे ७५ कोटी रुपये होत असल्याचा गंभीर आरोप ही रोहम यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!