तारीख सांगा,पुरावे घेऊन येतो;संतोष रोहमांचे बाळासाहेब थोरातांना खुले आव्हान

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी माझ्या शेतातील उसाचे एक टिपरू सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला जाते की नाही आणि दूध संघाला एक थेंब दूध जाते की नाही,याचे सर्व पुरावे घेऊन मी आपल्याला भेटायला तयार आहे.आपण तारीख सांगा; पत्रकारांच्या उपस्थितीत सर्व कागदपत्रे घेऊन येतो. असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते संतोष रोहम यांनी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रोहम यांनी म्हटले आहे की, पिंपरणे शिवारात वडिलोपार्जित शेती असून,यावर्षी त्यांनी शेतातील तीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली आहे.त्यांच्या उसाची नोंद थोरात साखर कारखान्याकडे आहे किंवा नाही,याची कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत खात्री करावी आणि त्यानंतरच आपल्यावर टीका करावी,असेही त्यांनी म्हटले आहे.

आपण पत्रकार परिषद घेऊन साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालाच्या अनुषंगाने तीन प्रश्न उपस्थित केले होते.लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते.मात्र,त्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केल्याचा आरोप रोहम यांनी केला आहे.

-कारखान्याच्या कारभाराबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार
कारखान्याच्या कारभाराबाबत प्रश्न विचारण्याचा मला शंभर टक्के अधिकार आहे,असे ठणकावून सांगत रोहम म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा वारसा आमच्या कुटुंबाला लाभला आहे.आमचे आजोबा पी.जे. रोहम हे आमदार होते.त्यामुळे आपल्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभला आहे.,मी आपल्या चारित्र्याला जपणारा कार्यकर्ता असून माझ्यावर वाळू-मुरूम वाहतुकीचे आरोप करण्यात आले आहेत.मी वाळू-मुरूम वाहून नेल्याचा एक तरी पुरावा द्या.तो पुरावा खरा ठरला तर हजारो लोकांसमोर लोटांगण घालून माफी मागेन,असे आव्हानही रोहम यांनी दिले.


-शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन प्रश्न उपस्थित केले.
यावर्षी शेतकरी विविध अडचणींना सामोरे जात आहे.या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासनासमोर आपण तीन मागण्या मांडल्या होत्या.ऊस उत्पादक सभासदांना दिवाळीच्या काळात ५० किलो साखर द्यावी,कारखान्याचे सभासदत्व संपलेल्या सभासदांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वारस सभासद म्हणून घ्यावे आणि सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासदत्व देणार की नाही,याबाबत कारखाना प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, असे हे प्रश्न होते.मात्र, या प्रश्नांना बगल देऊन माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली. एवढ्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारची टीका करणे अजिबात शोभत नाही,असे रोहम यांनी स्पष्ट केले.

-वार्षिक अहवालातील छायाचित्रांवरही प्रश्न
साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात चार व्यक्तींची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती.या व्यक्तींचे कारखान्यासाठी नेमके योगदान काय,असा प्रश्न आपण उपस्थित केला होता. तसेच,हा साखर कारखाना सहकारी संस्था आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी?” असा प्रश्नही विचारला होता. मात्र, या प्रश्नांवर उत्तर न देता आपल्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली. शेतकरी,शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आपण आवाज उठवत असून, ही भूमिका कोणत्याही व्यक्तीविरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.संविधान आणि लोकशाही मानत असाल, तर संविधानाच्या चौकटीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. प्रश्न विचारणे हा सभासद तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अधिकार आहे,असे संतोष रोहम यांनी ठामपणे सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!