अहिल्यानगर भुईकोट किल्ला विकासाला गती

Cityline Media
0
-पालकमंत्री डॉ.विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

-महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा; ऐतिहासिक वारसा जपत पर्यटन सुविधांचा होणार कायापालट

-महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार

अहिल्यानगर प्रतिनिधी शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे.भुईकोट किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यात नुकताच सामंजस्य करार एम.ओ.यु झाला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि स्थानक कमांडर पी.सुनील कुमार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील लष्कराच्या मुख्यालयात हा करार करण्यात आला.या करारामुळे किल्ल्याच्या संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित विविध विकासकामांना प्रत्यक्ष गती मिळणार आहे.
पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याचा विकास करण्याची घोषणा केली होती.भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेअंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली होती.

मात्र,भुईकोट किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने प्रत्यक्ष विकासकामे सुरू करण्यासाठी लष्कराची अंतिम परवानगी आवश्यक होती.या प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब झाला.आता महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार झाल्याने विकासकामांच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

-भुईकोट किल्ल्याचा होणार कायापालट
भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करताना पर्यटकांसाठी आधुनिक आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून परिसरातील पायाभूत सुविधांपर्यंत विविध विकासकामे केली जाणार आहेत.

यामध्ये भव्य प्रवेशद्वार, वाहनतळ आणि स्वच्छतागृहांची सुविधा उभारण्यात येणार आहे. तसेच किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीचे संवर्धन करून पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास आणि वास्तूचे महत्त्व समजावे यासाठी इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे.

किल्ल्याच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचे आकर्षण ठरणाऱ्या कामांमध्ये बुरुज क्रमांक १ ते ११ पर्यंत सुमारे १३७० मीटर लांबीचा नेचर वॉकवे प्रस्तावित आहे. किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुक्त नाट्यगृह उभारण्यात येणार असून, परिसरातील प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी सोलर पथदिवे करण्यात येणार आहे.

-ऐतिहासिक वारसा जपत पर्यटनाला नवी दिशा
भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे या विकास प्रकल्पात किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप आणि वास्तूचे महत्त्व जपत पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबत पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध झाल्याने भविष्यात भुईकोट किल्ला अहिल्यानगरच्या पर्यटन विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची अपेक्षा आहे.

सामंजस्य करार झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला वेग येणार असून, संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. भारतीय पुरातत्त्व विभाग, वन विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यक मान्यतांचाही त्यात समावेश आहे.

घोषणेपासून मंजुरीपर्यंत आणि प्रशासकीय प्रक्रियेपासून आता सामंजस्य करारापर्यंत पोहोचलेल्या या महत्त्वाकांक्षी भुईकोट किल्ला विकास प्रकल्पाला अखेर प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वैभवाला पर्यटन विकासाची जोड मिळणार असून, भुईकोट किल्ल्याचे रूपडे बदलण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे.
-जिल्ह्यात पर्यटनातून रोजगार निर्मिती 
“अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत.या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता.यासाठी त्यांचे सहकार्य मिळाले.पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न असून, जिल्ह्याला लाभलेला ऐतिहासिक,नैसर्गिक आणि अध्यात्मिक वारसा स्थळांचा विकास करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे.”
 पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!