ऐतिहासिक दुधेश्वर गडाला क वर्ग दर्जा द्या!

Cityline Media
0
भाविक,इतिहास अभ्यासक आणि ट्रेकर्सची राज्य शासनाकडे आग्रही मागणी;पर्यटन विकासाला मिळणार चालना

झरेकाठी सोमनाथ डोळे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात निमगावजाळी परिसरात वसलेला ऐतिहासिक श्री.क्षेत्र दुधेश्वर गड सध्या भाविक,निसर्गप्रेमी आणि तरुण ट्रेकर्सच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.अकराव्या शतकाचा ऐतिहासिक वारसा,पौराणिक महत्त्व आणि कळसूबाई डोंगररांगेतील विहंगम निसर्गसौंदर्य लाभलेल्या या प्राचीन शिवस्थानाला शासनाने तातडीने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र तसेच पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा,अशी मागणी भाविक,ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक आणि ट्रेकर्समधून जोर धरत आहे.
कळसूबाई रांगेतील शेवटचे उंच शिखर सह्याद्री पर्वतरांगेची उपरांग असलेल्या कळसूबाई डोंगररांगेतील हे शेवटचे टोक मानले जाते.दुधेश्वर गडाच्या पूर्वेकडील सलग डोंगररांग येथे संपत असल्याने भौगोलिक दृष्ट्याही या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गडाने गिर्यारोहक आणि ट्रेकर्सना मोठी भुरळ घातली आहे.

डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत अवघ्या २५ मिनिटांत पायी चढून पोहोचता येत असल्याने तरुणाईत या ठिकाणाची लोकप्रियता वाढत आहे.अहिल्यानगर, नाशिक,छत्रपती संभाजीनगर,संगमनेर, लोणी,कोपरगाव, राहाता आणि श्रीरामपूर परिसरातून दर आठवड्याला मोठ्या संख्येने ट्रेकर्स येथे येत आहेत.

पावसाळ्यात धुक्याची चादर आणि हिरवाईने नटलेला परिसर युट्यूबर्स,व्लॉगर्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
जागृत स्वयंभू शिवस्थानाची आख्यायिका
दुधेश्वर महादेव हे जागृत व स्वयंभू देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

एका गवळी बांधवाची गाय डोंगरावर चरत असताना एका ठिकाणी शिवलिंगावर दुधाची धार सोडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या ठिकाणी शिवलिंग असल्याचे लक्षात आल्याची आख्यायिका सांगितली जाते.त्यावरून या देवस्थानाला ‘श्री क्षेत्र दुधेश्वर’ असे नाव पडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते.

शांत,प्रसन्न आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते.श्रावण महिना तसेच महाशिवरात्रीच्या काळात मात्र भाविकांची मोठी गर्दी होत असते.लोकवर्गणीतून रस्ता, पायऱ्यांची उभारणी दुधेश्वर गडाच्या विकासासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी लोकवर्गणीतून रस्ता व पायऱ्यांची व्यवस्था केली आहे.

निमगावजाळी ते लोहारे रस्त्यावरून गडाच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. मात्र दिवसेंदिवस वाढणारी भाविक आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गडावरील पायऱ्यांचे मजबुतीकरण,सुरक्षित रेलिंग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, प्रकाश व्यवस्था तसेच सुरक्षित पर्यटनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. शासनाकडून मंजूर निधीतील तांत्रिक अडचणी दूर करून विकासकामांना गती देण्याची गरजही व्यक्त होत आहे.

नीलफलकातून इतिहास जतन करण्याचा प्रयत्न
सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या १९६ व्या पुण्यतिथीनिमित्त इतिहास अभ्यासक डॉ. विजय वदक आणि सुमित डेंगळे यांच्या संकल्पनेतून तसेच गावातील गोविंदा उद्योगसमूहाच्या सहकार्याने दुधेश्वर गडावर नीलफलक बसविण्यात आला आहे.

या नीलफलकाच्या माध्यमातून दुधेश्वरच्या अकराव्या शतकातील प्राचीन इतिहासाची माहिती पर्यटक आणि भाविकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.अशा उपक्रमांमुळे ऐतिहासिक वारशाचे जतन आणि नव्या पिढीत इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढण्यास हातभार लागणार आहे.
पर्यटन विकासाला मोठी संधी
धार्मिक श्रद्धा, प्राचीन इतिहास, सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य आणि ट्रेकिंगचा अनुभव या चारही बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने दुधेश्वर गडाला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता आहे. शासनाने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यास या परिसरातील मूलभूत सुविधांचा विकास होण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
नीलफलकाच्या माध्यमातून अकराव्या शतकातील प्राचीन वारसा जतन होण्यास आणि जनजागृती वाढण्यास मोठी मदत होईल.”
सुमित डेंगळे, इतिहास संशोधक
“दुधेश्वर परिसराचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी शासनाने या ठिकाणाला तातडीने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करावा. रस्ता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.”
डॉ. विजय वदक, इतिहास अभ्यासक
“व्यायाम आणि आध्यात्मिक शांतता यांचा सुंदर मेळ म्हणजे दुधेश्वर डोंगर. या गडाची नित्य परिक्रमा आणि पायी चढाई आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.”
 सामाजिक कार्यकर्ते सुमित डेंगळे,व राजेंद्र आरगडे औरंगपूर 

इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम
अकराव्या शतकाचा ऐतिहासिक वारसा, जागृत शिवस्थानाची श्रद्धा आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेला दुधेश्वर गड हा संगमनेर तालुक्याच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण करू शकतो. त्यामुळे शासनाने या ठिकाणाची धार्मिक व ऐतिहासिक ओळख जपत ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन नियोजनबद्ध विकास करावा,अशी जनभावना दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!