नाशिक दिनकर गायकवाड आरोग्यसंपदा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरच्या वतीने ‘नाते हृदयाचे हृदयाशी’ या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन गुरुदक्षिणा, पलाश हॉल येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत उत्साहात साजरा करण्यात आला .
हृदयविकाराचे प्रमाण वाढत असताना योग्य माहिती,प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि हृदयविकार नंतरच्या जीवनशैली विषयी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत डॉ. निलेश पुरकर (हृदयरोग शल्यचिकित्सक) यांनी आपले विचार व्यक्त केले.
अनिल वैद्य यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले.
प्रसंगी डॉ पल्लवी पुरकर यांनी आरोग्यसंपदाचे उपक्रम सविस्तर समजावून सांगितले. डॉ. प्रवीण गांगुर्डे यांनी ‘हृदयविकाराचा झटका, ऑजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियेनंतर येणारे नैराश्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. दिनेश महाजन यांनी ‘हृदयविकाराचा झटका, ऑजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियेनंतरचे लैंगिक जीवन’ या विषयावर प्रकाश टाकला.आहारतज्ज्ञ डॉ. श्वेता वाणी यांनी ‘आरोग्यदायी आणि चविष्ट खाणे शक्य आहे का?’ या विषयावर मार्गदर्शन करत आरोग्यदायी आहाराची संकल्पना स्पष्ट केली.
कार्यक्रमात डॉ. सत्यजित आहेर (हृदय शल्यविशारद), डॉ. विद्युत कुमार सिन्हा (हृदय शल्यविशारद), डॉ.संतोष वडिले (बालहृदयरोग तज्ज्ञ), डॉ. राहुल शेवाळे, डॉ. तुषार पाटील आणि डॉ. ऋषिकेश देसले या कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
माजी न्यायाधीश अनिल वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परी ठोसर यांनी केले.शेवटी नागरिक आणि तज्ज्ञ डॉक्टरां मध्ये थेट संवाद व प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. डॉ नितीन ठाकरे यांनी उपस्तितांचे आभार मानले.प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर विशेष भर देत हृदयविकार होण्यापूर्वीच जोखमी घटकांची ओळख, नियमित तपासणी, योग्य आहार,व्यायाम आणि जीवन शैलीतील बदल याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. हा उपक्रम नाशिककरांसाठी खुला असून आरोग्याच्या दृष्टीने त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले.
