पुरोगामी विचारांचा धगधगता दीपस्तंभ; अण्णा देहाडे

Cityline Media
0
इगतपुरीच्या सामाजिक, पत्रकारिता आणि आंबेडकरी चळवळीतील एक झंझावाती व्यक्तिमत्त्व

इगतपुरी प्रतिनिधी नाशिकच्या इगतपुरीतील सामाजिक,पत्रकारिता आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या पुरोगामी विचारांची ठाम छाप उमटविणारे अण्णा देहाडे यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
अण्णा देहाडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समता,सामाजिक न्याय,बंधुता आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी वाहून घेतले.अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, वंचित आणि शोषित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि लोकशाही व्यवस्थेला जाब विचारणे हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता.
-पत्रकारिता म्हणजे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम
अण्णा देहाडे हे केवळ पत्रकार नव्हते, तर पुरोगामी विचारांचे अभ्यासक आणि निर्भीड प्रश्नकर्ते होते. विविध नामांकित आणि पुरोगामी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संपादक तसेच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.दैनिक लोकरत्न आणि लोकनायक या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले.

पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी शासन आणि प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने जाब विचारला.त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी सहा प्रश्न विधानसभेत गाजले, ही त्यांच्या पत्रकारितेच्या प्रभावाची आणि अभ्यासपूर्ण मांडणीची पावती मानावी लागेल.
-आंबेडकरी चळवळीशी अखंड नाळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा त्यांनी आपल्या कार्यातून पुरस्कार केला. सामाजिक विषमता, अन्याय, जातीय भेदभाव आणि वंचितांच्या प्रश्नांविरोधात ते सातत्याने भूमिका घेत असत.

त्यांच्या पुरोगामी विचारांच्या प्रभावातून इगतपुरी नगरपरिषदेत नगरसेवक निवडून आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक परिवर्तन हे केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक सहभागातून घडले पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता.

-सहवासातून मिळालेले पत्रकारितेचे संस्कार
अण्णा देहाडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेल्या सहकाऱ्यांसाठी त्यांचा सहवास म्हणजे पत्रकारितेचा अनुभव, सामाजिक भान आणि पुरोगामी विचारांची शिदोरी होती. त्यांच्या सोबत काम करताना बातमीकडे केवळ बातमी म्हणून नव्हे, तर समाजाच्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी मिळाली.

त्यांच्या बोलण्यात स्पष्टता, विचारांमध्ये आंबेडकरी भूमिका आणि कामात सामाजिक बांधिलकी होती. तरुण पत्रकारांनी समाजातील दुर्बल घटकांचा आवाज बनले पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असे.

-आजही विचारांची मशाल तेवत आहे.
आज अण्णा देहाडे आपल्यात प्रत्यक्ष उपस्थित नसले,तरी त्यांनी निर्माण केलेली विचारांची मशाल, पत्रकारितेची मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आजही अनेकांच्या कार्याला दिशा देत आहे.

त्यांचे कार्य म्हणजे इगतपुरीच्या पुरोगामी चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. त्यांच्या स्मृती जपणे म्हणजे केवळ त्यांना आठवणे नव्हे, तर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष पुढे नेणे होय.

जन्मदिनी अण्णा देहाडे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
त्यांच्या पुरोगामी विचारांना आणि सामाजिक कार्याला मानाचा मुजरा.दैनिक भूगोल आणि सिटीलाईन न्यूज परिवारातर्फे अण्णा देहाडे यांना भावपूर्ण आदरांजली.
— दिनकर गायकवाड
सिटीलाईन न्यूज, नाशिक
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!