आमदार अमोल खताळ यांनी ऊर्जा राज्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेऊन दिले निवेदन
संगमनेर संपत भोसले संगमनेर विधानसभा मतदार संघातील वीज पुरवठ्याशी संबंधित असणारे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांनी मंत्रालयात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची नुकतीच भेट घेऊन वीज समस्येबाबत लक्ष वेधले तसेच संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील वीज उपकेंद्राचे काम तात्काळ सुरू करावे अशी ही मागणी त्यांनी ऊर्जा राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
संगमनेर तालुक्यातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवावा,तसेच वारंवार नादुरुस्त होणारे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलून नवीन रोहित्र बसवावेत,अशा विविध मागण्यांसह शेतीच्या कृषी पंपांचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा ,वारंवार नादुरुस्त होणारे रोहित्र तसेच नवीन विजेचे रोहित्र उपलब्ध न होणे या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
या विविध समस्यांचा शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याने वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे आमदार खताळ यांनी राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे मंजूर असलेल्या वीज उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करावे जेणेकरून या परिसरातील गावांचा वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल,अशी मागणीही आमदार अमोल खताळ पाटील यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली.
शेतकऱ्यांना वीजेअभावी शेतीच्या कामांत अडथळे येऊ नयेत नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात,यावरही त्यांनी भर दिला. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यात सुधारणा करून शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची भूमिका आमदार खताळ यांनी मांडली.
