शिर्डी कमलेश शेवाळे श्री साईबाबांच्या प्रसाद वितरणासाठी पर्यावरणपूरक ज्यूट पिशव्यांचा वापर करण्यात यावा,या उद्देशाने राष्ट्रीय ज्यूट बोर्ड,वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीला ५,००० ज्यूट पिशव्या विनामुल्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यापैकी १,००० ज्यूट पिशव्या नुकत्याच संस्थानकडे सुपूर्द करण्यात आल्या.
या निमित्ताने राष्ट्रीय ज्यूट बोर्डाचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी शशी भूषण सिंह आणि श्री साईबाबा संस्थानचे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या उपस्थितीत पाच साई भक्तांना या ज्यूट पिशव्यांचे वितरण करत उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय ज्यूट बोर्डाच्या मार्केट प्रमोशन विभागाचे संयुक्त संचालक व प्रमुख किशन सिंह घुघत्याल तसेच श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले उपस्थित होते.
श्री साईबाबा मंदिरात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना प्रसाद वितरणासाठी पर्यावरणपूरक ज्यूट पिशव्यांचा वापर केल्यास पर्यावरण संवर्धनाला हातभार लागण्याबरोबरच भाविकांमध्येही पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे.
या संदर्भात नुकत्याच राष्ट्रीय ज्यूट बोर्ड आणि श्री साईबाबा संस्थान यांच्यात झालेल्या बैठकीत श्री साईबाबांचा प्रसाद वितरणासाठी पर्यावरणपूरक व शाश्वत ज्यूट पिशव्यांच्या वापराबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर या वापरासाठी राष्ट्रीय ज्यूट बोर्डाने ५,००० ज्यूट पिशव्या विनामुल्य स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.
ज्यूट हा नैसर्गिक, नूतनीकरणक्षम आणि जैवविघटनशील तंतू असल्याने पारंपरिक कृत्रिम व एकदाच वापरल्या जाणाऱ्या पॅकेजिंग साहित्याला तो पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. प्रसाद घेऊन गेल्यानंतर भाविक या पिशव्यांचा घरगुती कामांसाठीही पुनर्वापर करू शकतात.
या माध्यमातून शिर्डीत येणाऱ्या भाविक, प्रसाद विक्रेते आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वापर व पुनर्वापर याबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच या पायलट उपक्रमाच्या माध्यमातून ज्यूट पिशव्यांचा प्रत्यक्ष वापर आणि त्याबाबतचा प्रतिसाद जाणून घेण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय ज्यूट बोर्डाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ५,००० ज्यूट पिशव्यांपैकी १,००० पिशव्या आज संस्थानकडे सुपूर्द करण्यात आल्या असून,उर्वरित पिशव्या पुढील टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
