राजकीय: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फुट पडल्याची चर्चा होती. पण वेळोवेळी हे कुटुंब एकत्र येताना दिसलं आहे. मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो की मग कौटुंबिक कार्यक्रम. ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी राजकीय चर्चांना मात्र नक्कीच उधाण आलं. आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली.
दोघे ही एकाच मंचावर दिसले. एवढेच काय तर राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसानंतर एकत्र पाहायला मिळाले. या सभेनंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआडा चर्चा केल्याने तर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. त्यामुळे काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का या चर्चेला आता परत एकदा उचल खालली आहे.
पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची सर्वसाधारण सभा होती. सभे ठिकाणी शेजारी ठेवलेल्या दोन खुर्च्या होत्या. एक खुर्ची अजित पवारांची तर दुसरी खुर्ची शरद पवार यांची होती. त्यामुळे हे दोघे एकत्र येणार का, हा प्रश्न या दोन खुर्च्यांभोवती फिरत होता. त्यामुळे काका-पुतण्या भेटणार का? बाजूबाजूला बसणार का? एकमेकांशी काय बोलणार? असे तमाम प्रश्न रांगेत उभे असतानाच होते.
त्याच वेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आले आणि दोघांच्या मध्ये बसले. आसन व्यवस्था निरखून पाहिली तर शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला जयंत पाटील बसलेले होते. विशेष म्हणजे दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पा ही सुरू होत्या. त्या कुणाच्या नजरेतून सुटल्या नाहीत.