उस बेणे,प्रक्रिया सुलभ-शेतकरी तंत्रज्ञान
आहिल्यानगर (प्रतिनिधी) जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील प्रयोगशील शेतकरी डॉ.विठ्ठलदास बालकिसन आसावा यांनी बरेच दिवसांपासून संशोधन करून उस बेणे प्रक्रिया सुलभ व कमी खर्चात व्हावी यावर नुकताच उपाय शोधला असुन शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अभिमान बाळगावा असे पीक म्हणजे ऊस होय.उसाच्या वाढीस अनुकूल हवामान महाराष्ट्रात उपलब्ध आहे.महाराष्ट्रातील शेतकरी कष्टाळू व प्रयत्नशील असल्यामुळे साखर उद्योगातून ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरी भागाची ही प्रगती झपाट्याने होत आहे.ऊस उत्पादनात व्यक्तिशःविक्रम करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेत.परंतु सरासरी प्रति हेक्टरी ऊस उत्पादनाचे चित्र मात्र निराशा जनक आहे आणि सतत घट चालले आहे.यामागे बरीच कारणेही आहेत. निसर्गाचा लहरीपणा,पाण्याचा अतिरेक वापर, अकुशल शेतमजूर सुधारित तंत्रज्ञान वापर इत्यादी.
अकुशल शेत मजुरांकडून लागवडीची कामे करताना शास्त्रीय तंत्र अवलंब करणे सुकर होत नाही.ऊस बेणे प्रक्रिया तंत्रज्ञान हा ही यातील एक घटक आहे.ऊस बेणे निवड, बेणे तोडणी, लागवडीच्या शेतावर वाहतूक,पाचट साळणे, टिपरे तोडणे, बेणे प्रक्रिया,टिपरे पसरविणे,माती आड करणे इत्यादी कामे मजुरांमार्फेत करावी लागतात.बेणे प्रक्रिया साठी किडनाशक अर्धा लिटर व बुरशीनाशक अर्धा किलो ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात द्रावण करून उसाची टिपरी बुडवावी लागतात. सुमारे दोन हजार रुपये पर्यंत खर्च यावर होतो.बहुतांश शेतकऱ्यांना अवलंब करणे शक्य नसल्याने ऊस बेणे प्रक्रिया शेतकऱ्याकडून होत नाही.
बॅटरी चलीत स्प्रे पंप द्वारे कीडनाशक २५ मिली व बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे ऊस टिपरेवर फवारणी करून बेणे प्रक्रिया सोपी केली आहे.यावर साधारणपणे दोनशे रुपये खर्च येतो.ऊस लागवडीच्या सुरुवातीच्या काळात किड व बुरशी पासून बेण्याचं संरक्षण झाल्याने उगवन क्षमता वाढते.यामुळे एकरी ऊस डोळ्यांची संख्या योग्य राखता येते.
कृषीभूषण आसावा संशोधित सुधारीत बेणे प्रक्रिया ऊस लागवड प्रकल्पास अहिल्यानगरचे आत्मा प्रकल्प संचालक प्रदीप लाटे,कृषी उपसंचालक सागर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके,तंत्र अधिकारी गोविंद कुलाल आदींनी भेट देऊन पाहणी केली.शेतकरी तंत्रज्ञान आत्मसात करून ऊस उत्पादकांनी अवलंब करावा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.प्रसंगी सहाय्यक अधिकारी प्रकाश महाजन,कृषी सहाय्यक प्रांजली कवडे आदी उपस्थित होते.
ऊसातील आंतरपीक हरभरा प्लॉटची पाहणी ही यावेळी मान्यवरांनी केली.हरभरा पिक संरक्षणासाठी बीज प्रक्रिया,चिकट सापळ्यांचा वापर याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.