'शेतकऱ्याच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी महात्मा ज्योतीराव फुले यांनी केली होती.
सोनगाव (शकुरभाई तांबोळी) ज्ञान हीच शक्ती आहे.विद्या हे धन आहे म्हणून मित्रहो अजूनही शिकण्यासाठी जागे व्हा,संघर्ष करा.शिक्षण म्हणजेच परिवर्तन. सामाजिक शांत क्रांतीचे प्रभावी साधन म्हणजे शिक्षण असून महात्मा जोतीराव फुले आमच्या समाजक्रांतीचे जनक आहेत. त्यांनी लिहिलेला 'शेतकऱ्याचा असूड' हा ग्रंथ आधुनिक भूमिपुत्र जोतीराव फुले यांच्या शेती व शेतकरी विषयक चिंतनाचा प्रमाणभूत आविष्कार असल्याचे मत प्रतिपादन सात्रळ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.नवनाथ अंगद शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. संतोष औताडे होते.प्रास्ताविक प्रा.डॉ.विजय सोनवणे यांनी केले.याप्रसंगी बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा.डॉ. बाळासाहेब औताडे,डॉ.श्रेयस पानसंबळ, प्रा.नामदेव मोरे,डॉ. सोनाली हरदास तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.नवनाथ शिंदे पुढे म्हणाले की महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे येथे ६ एप्रिल १८८३ साली लिहिलेल्या 'शेतकऱ्याच्या असूड' या पुस्तकात शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे.शेतकरी आणि जोडधंदा याचा मेळ घालावा. प्रादेशिक भाषेत शेतीविषयक पुस्तके प्रकाशित करावीत. पिकांची प्रदर्शने भरवावीत, शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात पाठवावे,त्यांना तेथील नवनवीन कौशल्य शिकून त्याचा उपयोग मायभूमीत करावा.पाणी आडवा-पाणी जिरवा लाकूडतोड विरोधी कायदा करावा,इत्यादी बाबत विचार जोतीराव गोविंदराव फुले यांनी मांडले आहेत.यामध्ये त्यांनी शेतीविषयक प्रश्नांचा ऐतिहासिक शोध घेतला, शेतकऱ्यांच्या दुःखस्थितीचे समग्र चित्रण केले,त्याची कारणमीमांसा करून त्यावर उपाययोजना सांगितल्या. एकूणच शेती व शेतकरी यांच्या प्रगतीसाठीचे वैचारिक चिंतन या ग्रंथात मांडलेले आहे."
पाच प्रकरणे आणि दोन परिशिष्ट अशा स्वरूपात लिहिलेले हे पुस्तक शूद्र शेतकऱ्यांचे बचावाकरिता लिहिल्याचा उल्लेख फुले सुरुवातीला करतात.ज्योतीराव फुले यांचे समग्र विचार क्रांतिदर्शी होते.त्यामध्ये समाजव्यवस्थेतील शोषित,वंचित,उपेक्षित, शुद्रातिशुद्र शेतकरी,कामगार समाजाच्या उत्थानाचा आग्रह केंद्रवर्ती होता,असे मत डॉ.शिंदे यांनी व्यक्त केले.यावेळी सूत्रसंचालन प्रा.शिवनाथ तक्ते यांनी केले.आभार मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनीता वडीतके यांनी मानले.
