आंबेडकरी पत्रकारितेची लेखणी: सम्राटकार बबन कांबळे

Cityline Media
0
काल ८ फेब्रुवारी २०२५ झाला 
सम्राटकारांचा द्वितीय स्मृतीदिन .
दैनिक वृत्तरत्न सम्राट आणि बबन कांबळे या दोहोंचं वाचकांशी असणारं अतूट नातं दोन वर्षांपूर्वी अचानक थांबल्यासारखं झालं .

दि ५ एप्रिल २००३ रोजी सुरू झालेला सम्राट हा बुद्ध अशोक कबीर शिवाजी फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जन्माला आला आणि अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून , तालुक्यातून , नगरातून , वाडीतून , वस्तीतून , तांड्यातून , पाड्यातून असणाऱ्या सिमेंट कॉंक्रिटपासून पत्र्याच्या तथा कौलारू घराघरात पोहोचला.केवळ पेपर पोहोचला नाही तर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा मूकनायक ते प्रबुद्ध भारतातील बदल घडविणारा ,ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असणारा,मन मेंदू सशक्त करणारा विचार दस्तऐवज घरातल्या प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचला .

पूर्वी कधीतरी एखाद्या विशिष्ट जयंती वा धम्मदीक्षा वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त निघणाऱ्या एखाद्या मासिकातील ,साप्ताहिकातील ,विशेषांकात असे लेख वाचायला मिळायचे.ते लेख आता महाराष्ट्रातील आंबेडकरी वाचकांना दररोज वाचायला मिळू लागले .बघता बघता सम्राट लाखोंचा टप्पा पार करून व्यवस्थेच्या छाताडावर बसून प्रस्थापितांना खडे बोल सुनावत ठिकऱ्या ठिकऱ्या उडवू लागला .

आंबेडकरी अन्यायग्रस्तांचे कवच तर लेखक कवी वक्त्यांना पुर्ण स्वातंत्र्य देत पानभर प्रसिद्धी देण्याचं काम सम्राटने केलं आणि आजही २३ व्या वर्षी करीत आहे .
या सगळ्यामागे संपादक महोदय मा. बबन कांबळे साहेब यांचा दूरदर्शीपणा ठळकपणे दिसून येतो. वर्तमानपत्र निघण्यापूर्वी अनेकांना "सम्राट"कार भेटले, परंतु कुणीच वर्तमानपत्र काढा असा सल्ला दिला नाही, काढले तरी चालेल का? नाही याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या .पेपर काढणं आणि चालवणं हे आपलं काम नाही .ते व्यापाऱ्यांनी करावं .आपण वर्तमानपत्राचा व्यापार करू शकत नाहीत . वर्तमानपत्र काढाल तर त्यासाठी तुमच्याकडे किती रक्कम आहे याचाही विचार करा .नसेल तर या भानगडीत पडू नका .
मात्र "सम्राट"कार या सगळ्या बाबींनी खचून जाणारे नव्हते .तेव्हा जर ते खचले असते तर आजचा सम्राट केव्हाच निर्माण झाला नसता ..आणि न निर्माण झालेल्या सम्राटास आणि सम्राटकारास आजचा आंबेडकरी वाचक मुकला असता .
जसे बाबासाहेब जर या भूमीवर जन्मलेच नसते तर आपल्या कित्येक पिढ्यानपिढ्या गुलामगिरी आणि दारिद्र्याच्या जोखडातून कधीही मुक्त झाल्या नसत्या .
 आजचं जग प्रचंड दहशतीखाली आहे.जगावर आणि देशावर हुकूमशाही वृत्तीच्या मानसिकतेचची सत्ता आहे .
या सत्तेविरुद्ध कुणी बोलू शकत नाही ना लिहू शकत नाही .बोललो आणि लिहिलो तर  पुढे काय होईल हे सांगता येत नाही .अशावेळी "सम्राट"कार असायला पाहिजे होते .
त्यांचे अग्रलेख म्हणजे सत्तेच्या डोळ्यात घातलेलं झणझणीत अंजन .सत्ताधारी सत्तेच्या गुर्मिने आणि अहंकाराने  कितीही मदमस्त झाला तरीही त्याला आणि त्याच्या सत्तेला न जुमानता त्याला चपराक मारण्याचं आणि वठणीवर आणण्याचं धाडस "सम्राट"कारांनी केलं आणि आताही त्यांच्या विचारांचा  वारसा चालविणारे संपादकीय मंडळ आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे पत्रकार करीतच आहेत .
परंतु "सम्राट"कार होते आणि आहेत यात बराच फरक आहे .असणं हे नसण्याला पर्याय ठरत नाही तर त्यासाठी अस्तित्वात असावंच लागतं .
सम्राटकारांचं अस्तिवच मुळी सम्राट आहे .सम्राटच्या प्रत्येक पानांपानांत,अग्रलेखात,हरेक बातम्यात , नव्हे तर एक न एक शब्दांत "सम्राट"कार बबन कांबळे आहेत ."सम्राट"कार यात वडीलधारी भूमिका निभावताना अचानकपणे निघून गेले म्हणजे जणू काही घरावर असणारं आपल्या कुटुंबाला अभय देणारं छप्परच कोसळलं असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे .परंतु "सम्राट"कारांनी आपल्यावर पत्रकारितेच्या माध्यमातून  केलेले संस्कारच आपल्या पुढील लेखणीची शिदोरी होय .
"सम्राट"कार बबन कांबळे साहेब केवळ संपादकच नव्हते तर ते एक कुशल संघटक , एक कुटुंबप्रिय वडीलधारं व्यक्तिमत्त्व , एक संवेदनशील मनाचा माणुस , सर्वसामान्य ते असामान्य लोंकाना सारखीच वागणूक देणारे समतेचे पुरस्कर्ते , जसा वेळ असेल त्याप्रमाणे वागणारे कार्यकर्ते ,आणि सतत कामात व्यस्त असणारे पत्रकार अश्या बहुरंगी आणि बहुढंगी भूमिकेत ते जगले आणि वागले देखील .त्यांनी सम्दुर सारंग वर जेवढे प्रेम केले तेवढेच एखाद्या आय ए एस अधिकाऱ्यांसह समाजातल्या नामांकित पुढाऱ्यावर केले .त्यांनी छोट्याशा तालुक्यातील पत्रकाराच्या बातमीला बाय लाईन पेज हेड करून  जेवढा न्याय दिला तेवढाच मुंबईला मंत्रालयात कार्य करणाऱ्या पत्रकाराला दिला .त्यांनी अनेक पत्रकार घडवले .केवळ पत्रकारच घडवले नाही तर त्यांच्या पत्रकारितेचं कसब पणाला लावून अनेक लेखक कवी स्तंभलेखक वक्ते आणि श्रोतेही घडवले .एखाद्या अत्युच्च विद्वान अभ्यासकाचं लांबलेलं रटाळवाणं अत्यंत विद्वत्ताप्रचुर भाषण "सम्राट"कारांच्या अत्यंत खिळवून ठेवणाऱ्या गोष्टीमय भाषणापुढे फिके ठरायचे .त्यामुळेच "सम्राट"कारांच्या भाषणाला अनेक धम्मपरिषदांमधून ,संमेलनातून ,परिसंवादात प्रचंड मागणी असायची आणि तो हॉल सभागृह प्रांगण पटांगण प्रचंड गर्दीने फुलून जायचे.एकप्रकारे "सम्राट"कार लेखणी अन् वाणीचे आंबेडकरी सेलिब्रेटी आयकॉन ठरायचे .

बरं दिसायलाही अगदी देखणे .अत्यंत गोरा रंग , मध्यम बांधा , भरदार आणि पिळदार शरीर , झुपकेदार मिशी , छान केलेली केसांची रचना ,अत्यंत नीटनेटका पोशाख यामुळे "सम्राट"कार अनेक मान्यवरांमधून उठून दिसत .साठी ओलांडूनसुद्धा त्यांच्यापुढे अगदी पस्तिशीचे तरुण फिके पडत .
कधी कधी मस्करीने आणि मिश्किलपणे ते म्हणत की , " मी जर पवार देशपांडे कुलकर्णी मिश्रा गुप्ता परमार गांधी शहा असतो तर कुठल्या कुठे गेलो असतो .त्यांनीच मला खासदार आमदार मंत्री बनवलं असतं किंवा एखादा पद्म , पद्मभूषण ,पद्मविभूषण वा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं असतं .परंतु मी कांबळे पडलो ना ...कांबळे त्यांना कसा चालेल अन् तो ही त्याच्या विरोधात लिहिणारा ...सम्राट मधून आग ओकाणारा ...हरकत नाही मलाही त्यांच्या सत्तेचा वा त्यांनी दिलेल्या पुरस्काराचा मोह नाही .माझ्या अग्रलेखावर आलेल्या प्रतिक्रिया अन् माझ्या भाषणाला झालेली गर्दीच माझी सत्ता आहे अन् मला प्रत्येक आंबेडकरी माणसाने केलेला जयभीम हाच माझा पुरस्कार आहे .यांची सत्ता पाच वर्षांनी येते आणि जाते .परंतु माझी सत्ता तर माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत आहे आणि राहिल.त्यामुळे मी कांबळे आहे तेच बरं ..."
या कांबळे नावाला ब्रँड देणारे "सम्राट"कारच होत आणि राहतील .
"सम्राट"कारांनी एक फार महत्वपूर्ण आठवण सांगितलीय आणि ती तुम्हाला सांगणे अत्यंत आवश्यक आहे .त्यावेळी शिवसेना अत्यंत फार्मात होती आणि बाळासाहेब ठाकरेंना भेटणं म्हणजे अत्यंत सन्मानाची बाब होती .त्यावेळी बाळासाहेबांनी मुंबईसह ठाणे रायगड आणि उपनगरातील पत्रकारांसाठी मातोश्रीवर भोजनाचे आयोजन केले होते .त्या पार्टीचे निमंत्रण "सम्राट" कारांना सुद्धा होतं ."सम्राट"कार तेथे उशिरा पोहोचले.आणि मोठ्या अदबीने बाळासाहेबांसमोर बसले .बाळासाहेब त्यांच्या मोठ्या लांब ओढणाऱ्या सिगारेटच्या झुरक्यासह "सम्राट"कारांकडे नजर रोखून पाहत होते .समोर जेवणाची पंचतारांकित व्हेज नॉनव्हेजची मेजवानी होती .सर्व पत्रकार जेवणावर प्रचंड ताव मारत होते .परंतु "सम्राट"कार बाळासाहेबांकडे त्यांच्या नजरेला नजर भिडवून डोळ्यांनी संवाद साधत होते.शेवटी न राहवून बाळासाहेब "सम्राट"कारांस म्हणाले , "अहो बबनराव , ठाण्याहून दमून थकुन आला असाल .जरा पोटोबा करून घ्या , "
त्यावर "सम्राट"कार म्हणाले ,"नाही बाळासाहेब मी कार्यालयात डबा आणला होता तो खाऊन आलोय ,मला आता या क्षणाला भूक नाही ,"
यावर बाळासाहेब गरजले ,"मग आलात कशाला , हे बघा तुमचेच पत्रकार बांधव जेवणावर कसे तुटून पडलेत ,तुम्ही कांबळे असून खात नाहीत ,"
त्यावर अत्यंत स्वाभिमानाने बबनराव बोलले ,"बाळासाहेब मी कांबळे आहे म्हणूनच खात नाही ,ठाकरे असतो तर खाल्लं असतं ."
आणि बाळासाहेबांसमोर त्यांना स्वतःला पिण्यासाठी (ओढण्यासाठी ) ठेवलेलं अत्यंत उंची सिगारेटच्या पाकिटातील एक सिगारेट हातात घेऊन बाळासाहेबांसमोर गेले आणि तेथे माचीसने ती उंची सिगारेट पेटवून एक खोटा खोटा सिगारेटचा झुरर्का आतमध्ये न ओढता बाहेरच्या बाहेर मारुन तशीच सिगारेट दोन बोटांत पकडून बाहेर निघून गेले .बाहेर गेल्यावर ती सिगारेट विझवून कचरापेटीत टाकून दिली .
याला म्हणतात स्वाभिमान .असा स्वाभिमान असेल तर कोणताही पत्रकार कोणत्याही पुढाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर होणार नाही .हाच वारसा आम्ही पुढे चालवतोय, राज्यकर्ता शासनकर्ता मोठा पुढारी कितीही जवळचा असला तरी आम्ही त्याच्यासोबत खाजगी ठिकाणी कधीही जेवण स्वीकारीत नाहीत ना त्याने दिलेली एखादी भेट .
अश्या अनेक आठवणींचा खजिना आहे ..काय सांगावे अन् किती सांगावे .
"सम्राट"कार होते तेव्हा जिवंत आठवणी होत्या आज ते नाहीत तर त्याच आठवणींना आपण उजाळा देतोय .
"सम्राट"कार ज्या दिवशी गेले तो दिवस ८ फेब्रुवारी २०२३ सम्राटच्या जडणघडणीला  २० वर्ष पुर्ण होऊन २१ व्या वर्धापनदिनाला सामोरे जाण्याच्या दोन महीने आधीच अचानकपणे "सम्राट"कार सम्राटला पोरके करून गेले .
नीलिमाआई ,कुणालदादा-वहिनी , कृपालभाऊ -वहिनी अन् आमच्या विदिशा अन् अभिज्ञाचे आज्जु असे घरातून दिसेनासे झाले.आम्हा पत्रकारांचा तर आधारच हिरावल्या गेला.खुप कठीण झालं या प्रसंगाला सामोरं जाणं.परंतु तथागतांच्या वचनाला अग्रस्थानी ठेऊन आम्ही सम्राटच्या पाठीशी उभे राहिलो आणि आजही आहोत.सम्राटकार शरीररूपाने नसले तरी त्यांची बुद्धवाणी आपल्या कानात सतत बुद्ध बाबासाहेबांचा विचार पेरत आहे आणि आंबेडकरी लेखणी आपल्याला सतत अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची प्रेरणा देत आहे .आज "सम्राट"कारांच्या द्वितीय स्मृतीदिनी विनम्र अभिवादन .जय भीम ...
जय प्रबुद्ध भारत ....
जय सम्राट ....

आनंद दिवाकर चक्रनारायण
मो ७०५८६३०३६६

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!