प्रिय संगिनी.. कशी आहेस ?काय सुरूय? सध्याच्या या ग्लोबल वातावरणात संवाद काहीसा थंडावला आहे.बऱ्याच गोष्टींना सुरुंग लागलेत.काहीही झालं तरी संवाद थांबता कामा नये.संवाद ही एकच गोष्ट प्रत्येक शंकेचे निरसन आहे.काळावेळेनुसार संवादात चढ उतार येतातच.मात्र, संवाद म्हणजे क्रांतिकारी संभाषण.
गर्दी नेमकी कशाची आहे याची चिकित्सा करायला वास्तविक वेळ नाही.म्हणून मैदान सोडून जाणे हा तुझा स्वभाव नाही.तसं पाहायला गेलं तर वेळ देखील आहेच पण स्वप्नांच्या रांगा आतल्या मनाला चंचल अस्थिर बनवतात.वयाच्या प्रत्येक टप्प्यावर विचारांची विभागणी जलदगतीने होते.आपण अर्ध्यातून जरा बाजूला होतो. पुन्हा चर्चेत येतो.एकट्या जीवावर जबाबदाऱ्याचं ओझं वाढत जातं आणि आपण एकटे पडत जातो एकांतात.एकांत आणि आकांत यात फारसा फरक नाही.अस्थिरतेत सगळी उत्तरं सापडतात.असो.
विचारांचा वारसा असलेल्या तुला जगण्याचा समास विविध पातळ्यांवर झोके घ्यायला भाग पाडतो. कलंडण्याची भीती असतेच पण त्याच तुला भय नाही हे ही नसे थोडके.तुला वाटत असेल आज महिला दिन आहे म्हणजे सामूहिक भावना उफाळून आल्या असतील. पण, तसं नाही. महिला दिन एक प्रकारे महिलेचा दुसरा वाढदिवस असं मला वाटतं.त्यामुळं जागतिक वाढदिवसाच्या तुला आधी शुभेच्छा.कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, काम, घरातली कामं, बाहेरची कामं, नको असलेला पण परिस्थितीने लादलेला प्रवास, आजारपण, समाजाने नेमून दिलेली स्वप्न, शिक्षण, मर्जीतले वागणे, आदर सन्मान आणि त्यात तुझ्या वैयक्तिक अडचणी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत असेल याची कल्पना आहे.या तुझ्या धैर्याचा सलाम.या सगळ्यात तुला काय वाटंत हे विचारायचं राहून गेलं. नेहमीच तसं होतं. तुझ्या सुप्त इच्छा कुठ आहेत ? त्याचं काय ? मनातल्या स्वप्नांचं काय ? मला सांगत नाहीस निदान तू तुला तरी सांगतेस का ? नसेल तर का सांगत नाही ? सांगायला हवं.अचानक मौनात राहणं म्हणजे भयानक गूढता. या गुढतेत बरेच काही असते. तो असतो संवाद. माझ्यापेक्षाही कैक पटीने तुझ्याही मनात बऱ्याच गोष्टी असतील. प्रश्न असतील. उत्तरं असतील, योजना असतील,आकृतीबंध बांधणी असेल.या सुंदर गोष्टी मनातच मरून जाण्याआधी त्या व्यक्त व्हायला हव्यात. पण तसं होत नाही. कामात दिवस निघून जातो आणि उद्याच्या कामांची यादी करून घडीभर झोप लागते. कधी कधी विचार येतो. झोप लागत असेल का ? की, झोपल्यावर या याद्या फिरत असतील डोक्यात ? तू म्हणजे कोडं आहेस. तुलाच अजून सुटलं नाही ते मला काय सुटणार ? पण माझा प्रयत्न असतो समजून घ्यायचा. त्यात कधी यश मिळतं हे तुझ्या व्यतिरिक्त कुणाला कळणार नाही हे ही तितकं खरं.
पुनर्जन्म मानणारी म्हतारी माणसं सांगतात बाईचा जन्म शेवटचा असतो.तसं असेल तर सर्व पुरुषांनी स्त्रीने भोगलेल्या सगळ्या गोष्टी भोगायची तयारी ठेवायला हवी.खोलात जाऊन विचार केला तर धास्ती बसायला लागते. कपडे कोणते कसे घालायचे पासून चालण्या बोलण्या पर्यंत तुला काळजी घ्यावी लागते.जग कितीही पुढं गेलं तरी मर्यादा पाहता बरंच काही मनासारखं करता येत नाही.नाहीतर संस्कार वगैरे पुढं आणतो समाज. लोक काय म्हणतील याची नाही म्हटलं तरी एक हलकी चिंता असतेच.ती तू सोडायला हवी.इतरांनाही सांगायला हवं. कोणत्याही घरातली स्त्री राब राब राबत असते. याचा अर्थ पुरुष काहीच करत नाही असं नाही. पुरुष जितके अश्रू झाकून टाकतो तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक तू झाकून टाकते. टचकन डोळ्यात आलेल्या पाण्याची कथा वेगळीच असते. ते तूच जाणो. तुझ्या असह्य त्रासात मासिक पाळीत होणारा त्रास आणि मुड्स स्विंग होतानाची स्थिती नाजूकपणे कुणाला समजून नाही आली तर होणारी चिडचिड हा तुझाच तुझ्या विरुद्ध मोठा संघर्ष असतो. काळजी घेणं, जीव लावणं, उधळून देणं, नातं जपणं इत्यादी संवेदनशील बाबी एकीकडे तर रणरागिणी होऊन लढाऊ होण, सहनशीलतेचा पराभव करणं, निडर होत जाणं दुसरीकडे. या एका नाण्यातल्या दोन बाजू निभावत राहणं तसं अवघडच आहे. हे सगळं किचकट न बनवता सोपं करून पुढं जाण्याची तुझी सवय कौतुकास्पद.तू स्पेशल, विशेष, महत्वाची आहेस.
तंत्रज्ञानाच्या युगात घडत असलेल्या अनेक बाह्य घटनांचा परिणाम नकळत आपल्या मनावर होतो. काही काळासाठी घटना, व्यक्ती वेळ आणि भवताल चुकीचा वाटायला लागतो. निर्णय क्षमता खालावत जाते. अशात तू धाडसाने प्रत्येक स्थितीला सामोरी जातेस. मिळालेलं हे एक आयुष्य कुरकुर न करता जगायचं या विचारांचा मोह मलाही होतो. पोहचवता येत नाही.आपण ज्या देशात आहोत त्या देशाला वैश्विक मानवता देणाऱ्या बुद्धांचा वारसा आहे त्यामुळं तुझी विचारधारा पक्की आहे. याचमुळे माझ्या मनातली कित्येक युद्ध तुझ्या खांद्यावर डोकं ठेवताच बुद्ध होतात. त्यामुळंच तू बुद्ध आहेस. तसं असणं समजणं हे एक नवं ओझं काही काळ वाटू शकतं. मात्र, हे लाघवी ओझं तुझ्या इतकंच सुंदर, धाडसी, शांत, संयमी, कृतिशील बनत जातं.
चलो... या दिवसात पत्र लिहणे संपत चाललेय त्यामुळं हा प्रपंच. पत्रातून समोर बोलता येत नसलेल्या अनेक गोष्टी कुणालाही बोलता येतात. व्यक्त होता येतात. या पत्रातली कायम सोबत असणारी, सोबतीचा प्रवास अविरत ठेवणारी साथी सोबती संगिनी जशी तू आहेस तशीच प्रत्येकाच्या आयुष्यात अशी संगिनी सामाजिक कौटुंबिक पातळीवर आई, बहीण, मैत्रीण, शिक्षिका, प्रवासी अशा विविध रूपात नात्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर कायम भेटत राहते, सोबत असते. काळजी घे. संवादी राहू. दुःख सोडून सुख वाटून घेऊ. तुझं दुःख मला दे. माझं सुख तुला घे. प्रेमाचा सर्वोच्च उच्चांक गाठणारी क्रांतिकारी वाट आहेस तू.
Happy Women's Day
तुझाच,
हृदयमानव अशोक
