बाईपण सांभाळत कधी बनते ताई ...
कधी माई ...
कधी दाई ..
तर कधी आई ...
प्रत्येक सृजनबिंदूपाशी ...
तिची असते छटा ...
श्रावणातल्या घननिळ्या घटा...
डोक्यावरल्या सावरलेल्या बटा ...
सर्वांना हवा तिच्यामधील वाटा ...
मुलगी जेव्हा बाई होते ...
जसं कोशातून फुलपाखरू उडते ...
कोमल कळीतलं जास्वंद बहरते ...
नव्या सृजनाची वाट प्रसवते ...
ती नसतेच कधी अबला ...
तिला मानावं सबला ...
टाळत जाते एकेक बला ...
पेरत जाते हरएक कला ...
हळवा स्वभाव ...
शांत बाणा ...
समजून घेणं ...
उमजून जाणं ...
स्पर्शाची ओळख ...
नजरेची पाळख...
हे तिलाच कसं जमतं ...
घर सांभाळत ...
लेकरं शाळेत सोडत ...
ऑफिसला जात...
सासर माहेर सारा संसार ...
नातेवाईकांसह मित्रमैत्रिणी ...
जन्म आजारपण वार्धक्य मरण ....
या सगळ्यांचा दुवा असते ती ...
ती रोज सर करते संसाराचा एव्हरेस्ट शिखर...
ती रोज साजरा करते एव्हरी इंपॉर्टेंट डे ...
ती सगळ्यांकडे लक्ष ठेवते ...
पण तिच्याकडे लक्ष नसतेच मुळी कुणाचे ...
सगळेच तिला गृहीत धरतात ...
सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या बिछान्यापर्यंत ...
जीवनाच्या रहाटगाडग्यात ...
संसाराच्या विचारचक्रात ...
सुखदुःखाच्या प्रवाहात ...
तिच्याशिवाय अपूर्णत्व ...
तिच्यासह जगण्याचं बळ ...
जागतिक महिला दिन साजरा करताना ..
तिला वगळून चालणार नाही ...
ताई माई बाई दाई ...
सर्वांमधून दिसणारी आई ...
तिला सांभाळलं नाही तर ....
तिच्यापोटी जन्म मिळणार नाही ...
आनंद दिवाकर चक्रनारायण
छाया : डॉ सुनील अभिमान अवचार
