सामाजिक जाणिवा प्रगल्भ असलेल्या चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारली रुग्णांसाठी एक लाखाची मदत

Cityline Media
0
अल्सरग्रस्त रुग्णाला मदतीचा हात; चित्रकार उदावंत व भागवत यांनी जपले दायित्व

श्रीरामपूर (प्रतिनिधी) वैद्यकीय खर्चाचा विषय येतो, तेव्हा परके सोडा आपले देखील पाठ फिरवतात, हे समाजाचे वास्तव छेदणारे कार्य चित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत यांनी करून दाखवले आहे.कला क्षेत्रातील या गुरू-शिष्याच्या जोडीने शहरातील अल्सरग्रस्त रुग्णाच्या मदतीसाठी श्रीरामपूर पत्रकार संघाच्या वतीने रंगरेषा मदतीच्या हा उपक्रम राबविला. या उपक्रमातून रुग्णाला तब्बल एक लाख रुपयांची मदत उभी राहिली आहे.
शहरातील योगेश वांढेकर या तरुणाला अल्सर झाला. केईएम रुग्णालय पुणे येथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.वांढेकर यांना झालेला अल्सर तिसऱ्या स्टेजचा असल्याने उपचाराचा खर्च मोठा होता. हा प्रकार शहरातील पत्रकार व चित्रकार भागवत यांना समजताच त्यांनी वांढेकर यांच्या मदतीसाठी 'रंगरेषा मदतीच्या' हा उपक्रम आझाद मैदानावर राबविला.

श्रीरामपूर पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे सोशल मीडियासह विविध माध्यमांवर कॅम्पेनींग केली.रविवारी श्रीरामपूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांचे अर्कचित्र काढून या उपक्रमाला आरंभ करण्यात आला. दिवसभरात उदावंत व भागवत यांनी १०० हून अधिक कलारसिकांचे अर्कचित्र रेखाटले.

सायंकाळी ६ वाजता जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनीही या उपक्रमाला भेट देत भागवत यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून स्वत:चे अर्कचित्र रेखाटले. उपक्रमाचा समारोप करताना ओला म्हणाले, श्रीरामपूरची पत्रकारीता संवेदनशील आहे. पत्रकार व चित्रकार भागवत, त्यांचे गुरू उदावंत यांच्या दायित्वाला सलाम. 

कला रसिकांनी अर्कचित्र साकारल्यावर दिलेली मदत १ लाख रुपये जमली.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते ही रक्कम पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर व पत्रकार संघाचे सदस्य यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.गाडेकर यांनी हा मदत निधी वांढेकर यांच्या बॅँक खात्यात उपचारासाठी वर्ग केला.या उपक्रमासाठी श्रीरामपूर पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

सलग नऊ तास अर्कचित्र रेखाटण्याचे रेकॉर्ड
सकाळी १० वाजता अर्कचित्र रेखाटण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ७ वाजता या दोन्ही चित्रकारांनी शेवटचे अर्कचित्र रेखाटले. नाश्त्यासाठी घेतलेला पाच मिनिटांचा ब्रेक वगळता उदावंत व भागवत यांनी नऊ तास सलग अर्कचित्र काढण्याचे अनोखे रेकॉर्ड नोंदविले. त्यांच्या या कलादायित्वाचे श्रीरामपूरकरांनी कौतूक केले आहे.

फोटो ओळी
श्रीरामपूर : रंगरेषा मदतीच्या या उपक्रमात चित्रकार रवी भागवत व भरतकुमार उदावंत कलारसिकांचे चित्र रेखाटताना.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!